उस्मानाबाद/लातूर : दुष्काळात कोणीही एकमेकांवर टीका न करता सरकारने उपाययोजना या प्रामाणिकपणे अमलात आणणे गरजेचे आहेत. उपाययोजना  करताना कोणत्याही नियम व अटी जनतेवर न लादता होता होईल तेवढा दिलासा दुष्काळग्रस्त जनतेला देणे गरजेचे आहे. दुसऱ्या राजकीय पक्ष किंवा व्यक्तींवर टीका करण्यापेक्षा सरकारला दुष्काळात करावयाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी भाग पाडू, असे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

दुष्काळी परिस्थितीला घाबरून आत्महत्या करु नका, शिवसेना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असेही ते म्हणाले. सोमवारी उमरगा व लोहारा तालुक्यातील नारंगवाडी, समुद्राळ व परिसराचा त्यांनी दुष्काळ पाहणी दौरा केला. यावेळी पाणीपुरवठय़ाच्या टाक्या व जनावरांसाठी पशुखाद्याचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले.

लातूर- सरकारच्या वतीने कर्जमाफीचा डांगोरा पिटला जात आहे. प्रत्यक्षात २०-२५ रुपयेच शेतकऱ्यांचे माफ होतात. आम्हाला कर्जमाफी नव्हे तर शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती हवी आहे व शिवसेना ती मिळवून देईल, असे आश्वासन देणारे विधान युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे केले.

आदित्य ठाकरे सोमवारी लातूर जिल्हा दौऱ्यावर होते. औसा तालुक्यातील चलबुर्गा व बुधोडा या गावातील शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. ठाकरे म्हणाले, या भागात रब्बीची पेरणी झाली नाही. तुम्ही संकटात असताना शिवसेना तुमच्या सोबत आहे. तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान करता याकडे न पाहता शिवसेना तुमच्या मदतीला येईल. पूर्वी मार्च, एप्रिलमध्ये दुष्काळ येत होता. आता ऑक्टोबर महिन्यापासूनच दुष्काळ येत आहे. दुष्काळ कितीही गंभीर असू द्या, शिवसेना पशुखाद्य, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या या माध्यमातून मदत करते आहे. शेतकऱ्याच्या मुलीचे लग्नदेखील शिवसेना लावून देईल. कधीही हाक मारा, शिवसैनिक तुमच्या मदतीला येतील, अशा शब्दात त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला.

ठाकरे यांनी कर्जमाफी आणि कर्जमुक्तीबाबबतही केलेले विधान राजकीयदृष्टय़ा महत्त्वाचे मानले जात आहे. आदित्य ठाकरे यांचे कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती हवी आहे, या विधानाचे राजकीय अर्थ काढले जात असून त्यातून भाजप व शिवसेना यांच्यातील संबंधात अधिकच अंतर पडेल, असा विश्लेषकांचा अंदाज आहे.