मनसेने टोल नाक्याच्या प्रश्नाविषयी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात काही महिन्यांपूर्वी न्यायालयात प्रकरणही दाखल करण्यात आले असले तरी त्यांची सुनावणी अद्याप बाकी आहे. यामागे नेमके काय राजकारण आहे ते लक्षात येत नाही, असे नमूद करतानाच आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस सरकारकडून प्रशासनाचा वापर करीत विविध प्रलोभने जनतेला दाखविणे ही तर काँग्रेसची जुनी खेळी आहे, असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.
येथील राजगड या पक्ष कार्यालयात बुधवारी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. वाहनांसाठी टोल दिवसागणिक वाढत आहे. मात्र  टोलनाक्यांविरोधात न्यायालयात दाखल केलेले एकाही प्रकरणाची अद्याप सुनावणी झालेली नाही असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मदरशांना आर्थिक मदत जाहीर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर त्यांनी सडकून टिकास्त्र सोडले. ही काँग्रेस सरकारची जुनी खेळी आहे. निवडणुका जवळ आल्या की काही घटकांना ते प्रलोभन दाखविण्यास सुरूवात करतात. मात्र अल्पसंख्यांक समाज अशा प्रलोभनांना आता बळी पडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पर्यूषण पर्वाच्या अनुषंगाने मुंबई महापालिका आयुक्तांनी कत्तलखाने बंद ठेवण्याविषयी तसेच मांसाहार न करण्याविषयी केलेल्या सूचनेचाही ठाकरे यांनी समाचार घेतला. कोणी कधी काय खावे हे आयुक्तांनी सांगु नये. हा विषय त्यांच्या अखत्यारीत येत नाही. असा फतवा ईद किंवा सध्या श्रावण सुरू असतांना का काढण्यात आला नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सध्या सत्ताधाऱ्यांकडून प्रशासनाचा राजकारणासाठी वापर होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. पत्रकार परिषदेस प्रविण दरेकर, वसंत गिते, उत्तम ढिकले, नितीन भोसले या आमदारांसह महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक आदी उपस्थित होते.