मधुमेहावरील औषधांद्वारे आता वजन कमी करणे शक्य असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनात स्पष्ट झाले आहे. या औषधांमुळे शरीरातील संप्रेरकांवर नियंत्रण ठेवून वजन कमी करता येणे शक्य असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

सेमाग्लुटाइड ही पेप्टाइड-१ प्रमाणे एक रासायनिक संरचना आहे. त्याद्वारे इन्शुलिन आणि भूक या दोहोंवर नियंत्रण ठेवले जाते. लठ्ठपणा असणाऱ्या लोकांमध्ये सेमाग्लुटाइडद्वारे वजन कमी करण्यासंबंधी हे संशोधन आहे. परंतु मधुमेह नसला तरी या औषधांच्या माध्यमातून सर्वाधिक वजन कमी करणे शक्य आहे, असे अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना येथील वैद्यक विद्यापीठातील संशोधक पॅट्रिक एम ओनिल यांनी सांगितले.

एन्डोक्राइन सोसायटीच्या वार्षिक बैठकीत हे संशोधन मांडण्यात आले. ९५७ जणांवर हे संशोधन करण्यात आले असून त्यात ३५ टक्के पुरुषांचा समावेश आहे. सहभागी असलेल्या कोणालाही मधुमेहचा विकार नव्हता. या सर्वाना सात वेगवेगळ्या गटांमध्ये विभागण्यात आले.

पाच गटांतील व्यक्तींवर सेमाग्लुटाइडचा डोस दिवसातून एकदा देण्यात येत होता. सहाव्या गटातील व्यक्तींना प्लेसबो तर सातव्या गटातील व्यक्तींना मधुमेहावरील औषधांचा डोस देण्यात आला. तसेच, सर्वाना एकसारखा आहार आणि व्यायाम देण्यात आला.

एका वर्षांनंतर सेमाग्लुटाइडचा डोस दिलेल्यांचे वजन घटल्याचे स्पष्ट झाले. या गटातील व्यक्तींचे वजन सहाव्या गटातील व्यक्तींपेक्षा अधिक होते.

म्हणजेच ०.०५ मायक्रोग्रॅम सेमाग्लुटाइडचा डोस दिल्याने ६.० टक्के वजन घटत असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले.