”भाजपावर टीका करणं, ही संजय राऊत यांची ड्युटी आहे आणि ते आपली ड्युटी योग्यपणे पार पडत आहेत. मात्र, इतरांनी टीका केलेली त्यांना चालत नाही, त्यांना लगेच टोचतं ! तसेच शरद पवारांचा सल्ला मुख्यमंत्री घेतात, हे संजय राऊतांनी मान्य केलं आहे. म्हणजे पवार सरकार चालवतात हे शिवसेनेनं मान्य केलं.” असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपावर केलेल्या टीकेला उत्तर देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

हिंदुत्वावरूवन निशाणा साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ”त्यांचं हिंदुत्व वेगळंच आहे. कारण, त्यांच्या सोबत सत्तेत असलेल्या काँग्रेसने सावरकरांवर टीका केली. तरी देखील आपण ऐकलंच नाही, असं दाखवून कानात बोळे घालून बसणं हे त्यांचं हिंदुत्व आहे. आम्ही छातीठोकपणे सांगतो की, आम्ही घटनेतील जो सर्वधर्म समभाव आहे तो मानतो. पण त्यात जर हिंदुंवर अन्याय म्हणजे जर सर्वधर्म समभाव असेल, तर आम्हाला मान्य नाही, तो त्यांना मान्य आहे.”

तसेच, ”बरं झालं आज त्यांनी मान्य केलं की शरद पवारचं महाराष्ट्र चालवत आहेत. पवारांचं मार्गदर्शन त्यांनी घेण्याबद्दल आमचा काही आक्षेप नाही. मी एवढच म्हटलं की पवारांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र चालतो आणि मुख्यमंत्री हे नावालाच आहेत. पवारांचं मार्गदर्शन त्यांनी घेण्यात आमच्या पोटात दुखण्याचं काय कारण? तुमचा संसार आम्ही त्याबद्दल मनात काही ठेवण्याचं कारण नाही.” असं देखील यावेळी चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवलं.