देशाच्या उद्योग क्षेत्रातील अग्रणी आणि ‘आयटीसी’ या बहुराष्ट्रीय भारतीय कंपनीचे अध्यक्ष वाय. सी. देवेश्वर (वय ७२) यांचे शनिवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.

देवेश्वर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. देवेश्वर २०१७ मध्ये इंडियन टोबॅको कंपनीच्या (आयटीसी) कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून पदमुक्त झाले होते. परंतु ते कंपनीच्या अकार्यकारी अध्यक्षपदावर होते. गुरुग्राम येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

देवेश्वर यांच्या निधनामुळे तीव्र दु:ख झाल्याची भावना ‘आयटीसी’चे व्यवस्थापकीय संचालक संजीव पुरी यांनी व्यक्त केली. देवेश्वर यांनी शाश्वत आणि समावेशक उद्योगवाढीचा दृष्टिकोन ठेवला. व्यापक सामाजिक मूल्यनिर्मितीत उद्योगही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, हे त्यांनी दाखवून दिले. त्यातूनच ‘आयटीसी’ने साठ लाख लोकांच्या उपजीविकेला आधार देणारी उद्योग प्रारूपे अमलात आणली, असे पुरी यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

देवेश्वर १९६८मध्ये ‘आयटीसी’मध्ये रुजू झाले. नंतर ते ११ एप्रिल १९८४ रोजी ‘आयटीसी’चे संचालक झाले. १ जानेवारी १९९६ रोजी ते पहिले कार्यकारी प्रमुख आणि अध्यक्ष बनले. ‘आयटीसी’ ही केवळ एक सिगारेट कंपनी होती, पण तिचा विस्तार इतर अनेक उद्योगक्षेत्रांत झाला. देवेश्वर यांनी १९९०च्या मध्यावधीत कंपनीची सूत्रे हाती घेतली तेव्हा अनेक आव्हाने होती. कंपनीचा महसूल ५२०० कोटी रुपये होता आणि नफा ४५२ कोटी रुपये होता. २०१७-१८ मध्ये कंपनीचा महसूल ४४३२९ कोटी ७७ लाख रुपये होता, तर नफा ११२२३ कोटी २५ लाख रुपये होता.

देवेश्वर यांनी ‘आयटीसी’चा कायापालट करून पर्यावरणस्नेही कंपनी असा नवा लौकिक मिळवून दिला. देवेश्वर दिल्ली आयआयटीचे माजी विद्यार्थी होते. त्यांचे शिक्षण हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये झाले. त्यांनी ‘एअर इंडिया’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून १९९१-१९९४ दरम्यान काम केले होते. त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

देशाच्या जडणघडणीतही देवेश्वर यांचा मोठा वाटा आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ दी रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाचे ते संचालक होते. नॅशनल फाऊंडेशन फॉर कार्पोरेट गव्हर्नन्सचे सदस्य, तर राष्ट्रीय उपयोजित अर्थशास्त्र संशोधन मंडळाचे सदस्य  होते. ‘लेट अस पुट इंडिया फर्स्ट’ असे आवाहन त्यांनी केले होते. ते ‘वायसीडी’ या नावाने प्रसिद्ध होते.

योगेश्वर यांनी देशाच्या उद्योगक्षेत्रात भरीव योगदान दिले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आयटीसी कंपनीने जगातही ठसा उमटवला.       नरेंद्र मोदी, पंतप्रधान