जम्मू काश्मीरच्या पुलवामा मध्ये आपल्या देशाचे जवान शहीद झाले. या घटनेमुळे सगळा देश शोकसागरात बुडाला होता. मात्र या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तराखंड येथील जिम कॉर्बेट नॅशनल पार्क या ठिकाणी एका सिनेमाचे व्हिडिओ शुटिंग करण्यात व्यग्र होते असा आरोप काँग्रेसने केला आहे. त्याच आरोपांना पाठिंबा देणारा एक ट्विट धनंजय मुंडे यांनी केला आहे.

धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काही फोटो ट्विट केले आहेत. एका फोटो मध्ये नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर आहेत, फोटोग्राफर समोरची गर्दी टीपतो आहे आणि ते त्याच्याकडे बघत आहेत असा हा फोटो आहे. तर दुसऱ्या फोटोत पिंजऱ्यातल्या वाघाचा फोटो मोदी काढत आहेत. तिसऱ्या फोटोत जिम कॉर्बेट नॅशनल पार्कच्या शुटिंगचा फोटो आहे. हे सगळे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. ज्यांचा आधार घेत फोटोशूट सरकार #PhotoShootSarkar हा हॅशटॅगही धनंजय मुंडे यांनी ट्रेंड केला आहे. देशात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत असताना पंतप्रधान कसे फक्त स्वकेंद्रीच आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांनी त्यांच्या ट्विटमधून केला आहे. आता या टीकेला भाजपा नेत्यांकडून उत्तर दिले जाणार की नाही हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.