हर्षद कशाळकर

वादळाने घर, घरातील समान आणि पिकती बागही नष्ट केली आहे… त्यामुळं आता आयुष्य शून्यावर येऊन थांबलं आहे…. काय करावं, सुचत नाही… श्रीवर्धनमध्ये ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे अतोनात नुकनास झालेल्यांच्या या प्रतिक्रिया आहेत. गावागावात फिरतांना याचाच अनुभव येतो आहे.

श्रीवर्धन शहरात प्रवेश केल्यावर रस्त्याच्या दुतर्फा मोडलेला झाडांचे अवशेष पहायला मिळतात, अस्ताव्यस्त पडलेले पत्र, वाकलेले वीजेचे खांब, लटकणाऱ्या तारा, सर्वत्र पसरलेला पाला पाचोळा दिसून येतो, वादळाचा विध्वंस काय असतो याची अनुभूती येते.

शहरातील एकही परिसर असा नाही जिथे नुकसान झालेलं नाही. नारळ, सुपारीच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत. बहुतांश वाड्यामध्ये आज एकही झाड शिल्लक राहिले नाही. भैरवनाथ पाखडी, नारायण पाखडी, नारायण पाखडी, पेशवे आळी, चौकर पाखडी मेटकरणी येथील अवस्था बिकट आहे. जीवना बंदर, मुळगाव कोळीवाडा परिरातील परिस्थिती अधिकच बिकट आहे. मच्छिमार बोटींचं नुकसान झालं आहे. घरांचंही नुकसान झालं आहे. मासेमारीच्या जाळ्यांची मोडतोड झाली आहे.

वादळाने श्रीवर्धनचा समुद्र किनारा उध्वस्त केला आहे. किनाऱ्यावर लागवड केलेली सुरुची झाड भुईसपाट झाली आहेत. सर्वत्र मोडलेल्या झाडांचा खच पडला आहे. निसर्गाचा प्रकोप काय असतो याचा अनुभव श्रीवर्धनमधील नागरिकांना आला आहे. वीज आणि पाण्याअभावी येथील लोकांचे हाल होत आहेत.

“वादळाने आमचं घराचं नुकसान झालं, घराशेजारील नारळ सुपारीची बाग संपूर्ण नष्ट झाली. आयुष्यचं गोठल्यासारखं झालं. तीन तासाच्या वादळाने सर्वकाही हिरावून घेतलं,” असं नारायण पाखडी येथील गजानन करमरकर सांगतात.

“वादळाने आमचं आयुष्य हादरवून टाकलं. ५ हजार चौरस मीटर गोडाऊनच नुकसान झाले आहे. आता त्याची दुरुस्ती करण्याची आर्थिक परिस्थिती राहिली नाही,” अशी प्रतिक्रिया स्थानिक जसवली येथील आझाद वतारे यांनी दिली.

तर मेटकर्णी येथील शामनाथ निकम म्हणतात, “वादळात आमचं घर मोडलं, समानाच नुकसान झालं, होतं नव्हतं ते सोबत घेऊन आम्ही बस स्थानकात आलो आहोत, पाच दिवसात आमची विचारपूस करायला कोणीही आलेले नाही. प्रशासकीय यंत्रणा मदत करायला तयार नाही.