‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप नेते जय भगवान गोयल यांच्या ‘आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून राज्यात मोठा गदारोळ सुरू आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या प्रकरणी छत्रपतींच्या वंशजांनी बोलावे, अशी मागणी केली होती. त्यावर साताऱ्याचे माजी खासदार, भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. त्यातच हे पुस्तक मागे घेण्यात आल्याने हे प्रकरण शांत होण्याची चिन्हे असतानाच आता भाजपाच्या माजी आमदाराने एक वादग्रस्त विधान केलं आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींशी केलेली तुलना म्हणजे शिवाजी महाराजांचा सन्मान आहे,” असे मत भाजपा नेत्याने व्यक्त केलं आहे.

कोण आहे हा नेता आणि काय म्हणाला तो?

‘आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’ या पुस्तकासंदर्भातील वादावर प्रितिक्रिया देताना भाजपाचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी मुक्ताफळे उधळली आहेत. “पंतप्रधान नरेंद्र मोदींशी शिवाजी महाराजांची तुलना करणे चुकीचे नाही. या पुस्तकाचे लेखकाचे मी समर्थन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवाजी महाराजांच्या तुलनेत गैर काहीच नाही. ही तुलना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मानच आहे,” असं मत हळवणकर यांनी भाजपाच्या बैठकीमध्ये बोलताना व्यक्त केलं.

मोदी आणि शिवाजी महाराजांच्या कामात साम्य असल्याचा दावा

छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं काम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असलेल्या कामामध्ये साधर्म्य असल्याचा दावाही हळवणकरांनी केला आहे. या दाव्याला पाठिंबा देण्यासाठी हळवणकरांनी मोदींनी सुरु केलेल्या काही योजनांचा संदर्भ दिला. हळवणकरांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

(सुरेश हळवणकर आणि देवेंद्र फडणवीस (फाइल फोटो))

फडणवीसांनी टोचले लेखकाचे कान

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधीपक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाबद्दल मंगळवारी आपली भूमिका स्पष्ट केली. “आपल्या लिखाणातून काय अर्थ निघू शकतो याचा विचार करूनच प्रत्येकाने लेखन केले पाहिजे”, अशा शब्दांत फडणवीस यांनी पुस्तक लिहिणारे भाजपचे जय भगवान गोयल यांचे कान टोचले आहेत. “छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वाचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही आणि ती कुणी करूही शकत नाही,” असं फडणवीस म्हणाले.