अवनी वाघिणीच्या मृत्यूवरुन केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी राज्यातील वन खात्यावर टीका केली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. अवनी वाघिणीला गोळ्या घालून ठार करण्याचा निर्णय घ्यावा लागणे ही दुःखद घटना आहे. पण या वाघिणीला मारण्याच्या प्रक्रियेत त्रुटी राहिल्यात का याची सखोल चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

दोन वर्षांत १३ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा ठपका असलेल्या पांढरकवड्यातील ‘टी-१’ या पाच वर्षांच्या वाघिणीला जेरबंद करण्याचे वनखात्याचे सर्व प्रयत्न फसल्यानंतर अखेर शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास तिला गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. यावरुन वनखात्यावर टीका होत आहे. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी देखीर राज्य सरकारवर टीका केली होती. अवनी या वाघिणीची ज्या निर्दयी पद्धतीने हत्या करण्यात आली, त्याचे मला अतीव दु:ख होत आहे. ही हत्याच आहे, हा गुन्हा आहे. अनेकांनी विनंती करुनही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या वाघिणीला ठार मारण्याचे आदेश दिले, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, वाघिणीला ठार मारण्याचा निर्णय घ्यावा लागणे ही दु:खद बाब आहे. मनेका गांधींचे प्राणीप्रेम आम्हाला माहित असून त्यांनी कठोर शब्दात केलेली टीका आम्ही समजू शकतो. वाघिणीला ठार मारण्याच्या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करुन या प्रक्रियेत काही त्रुटी होत्या का?, याचा तपास केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

प्राणीप्रेमींचा आक्षेप काय?
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या नियमानुसार सूर्यास्तानंतर कोणत्याही वन्यप्राण्याला बेशुद्ध करता येत नाही किंवा गोळी घालता येत नाही. परिस्थिती खूपच वाईट असेल तर अपवादात्मक प्रकरणात प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) यांच्याकडून विशेष परवानगी घेऊन तसे करता येते. वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी वापरले जाणारे औषध हाताळण्याचा अधिकार भारतीय वैद्यकीय परिषदेच्या नोंदणीकृत पशुवैद्यकांनाच आहे. मात्र, या वाघिणीला एका वनरक्षकाने बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केल्यामुळे याठिकाणी नियमाची पायमल्ली झाल्याचा आरोप होत आहे. तसेच वाघिणीला मारण्यासाठी हैदराबादचा नेमबाज नवाब शआफ़तअली खान याला पाचारण करण्यात आले. नवाबचा मुलगा असगर याने तिला गोळी घालून ठार केले. यावरही आक्षेप घेतला जात आहे.