परभणी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी व शिवसेना या प्रमुख पक्षांना मतविभागणीसाठी आपापल्या सोयीचे उमेदवार हवे आहेत! त्या दृष्टीने दोन्ही बाजूंनी वेगवेगळ्या शक्यता तपासून पाहिल्या जात आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांना सेनेची मते फोडण्यास मनसेचा उमेदवार आवश्यक वाटू लागला आहे, तर सरळ लढतीत दलित-मुस्लिम मतांच्या एकगठ्ठा पद्धतीला सुरूंग लावणारा तिसरा उमेदवार सेनेला हवा आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या परंपरागत मतदारांना फोडणाऱ्या बंडखोर उमेदवाराने आमदार संजय जाधव यांना विजय मिळवून दिला. त्या दृष्टीने विधानसभेचेच गणित लोकसभेलाही जुळविण्याच्या प्रयत्नात शिवसेना आहे. परभणी लोकसभेत सातत्याने सेनेचा विजय होत आला असला, तरी या वेळची निवडणूक दोन्ही तुल्यबळ उमेदवारांमध्ये होत आहे. भांबळे यांची उमेदवारी प्रभावी मानली जात आहे, तर दोन वेळा परभणी विधानसभेचे प्रतिनिधित्व करणारे आमदार जाधव यांना सेनेने लोकसभेसाठी बढती दिली आहे. शिवसेनेला सातत्याने हा जिल्हा खासदारकी बहाल करतो. मात्र, पक्षाचा खासदार पुढे पक्षाशीच एकनिष्ठ राहत नाही, असा इतिहास आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता प्रचारासाठी हा मुद्दा पुढे करण्यात येत आहे. खासदार पक्ष बदलतात तेव्हा आता मतदारांनीच पक्ष बदलून मतदान करावे, असे आवाहन राष्ट्रवादीच्या वतीने केले जात आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार भांबळे यांना तिसऱ्या आघाडीचा प्रभावी उमेदवार अडसर ठरू शकतो. अजून राष्ट्रवादीच्या मतदानाला सुरूंग लावणारा उमेदवार जाहीर झाला नाही. त्यामुळे सेनेत अस्वस्थता आहे. राष्ट्रवादीच्या दलित-मुस्लिम या मतांना आपल्याकडे आकर्षित करणारा उमेदवार िरगणात असेल, तर सेनेला परभणीची लढत सोपी जाईल, असे वाटते.
परभणीत बहुजन समाज पक्षाने उमेदवारी जाहीर केली असली, तरी ‘एमआयएम’ या पक्षाचा उमेदवार अजूनही जाहीर झाला नाही. बसप उमेदवाराने आपल्याला एमआयएमचा पाठिंबा असल्याचे एका पत्रकार बठकीत सांगितल्यानंतर एमआयएमच्या वतीने लगेचच याचा साफ इन्कार करण्यात आला. एमआयएम परभणीत स्वतंत्र निवडणूक लढविणार असून आमचा कोणालाही पाठिंबा नाही, असे या पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. राष्ट्रवादीची मतविभागणी करणारा उमेदवार िरगणात उतरत नाही तोवर शिवसेनेत अस्वस्थताच राहणार आहे.
दुसऱ्या बाजूने सेनेच्या परंपरागत मतदारांमध्ये फूट पाडणारा उमेदवार राष्ट्रवादीला हवा आहे. मनसेचा उमेदवार शिवसेनेची मते कमी करूशकतो, हे खरे असले तरी मनसेने अजून तरी उमेदवारी घोषित केलेली नाही. पक्षाचे जिल्हाध्यक्ष बालाजी मुंढे हे लोकसभेपेक्षाही गंगाखेड विधानसभेसाठी इच्छुक असल्याने या पक्षाला अजून तरी उमेदवार सापडलेला नाही. गेल्या आठ दिवसांपासून चाचपणी सुरू आहे. या बरोबरच एक-दोन नावांची मनधरणीही मनसेच्या वतीने करण्यात आली. परभणी लोकसभा मतदारसंघाच्या मतपत्रिकेवर इंजिन दिसले पाहिजे, असे मनसेच्या नेत्यांना वाटते. पण उचित उमेदवार त्यांना अजून सापडला नाही.
शिवसेनेच्या परंपरागत मतदारांमध्ये फूट पाडणारा उमेदवार मनसेकडून आल्यास राष्ट्रवादीला त्याची मदतच होणार आहे. राष्ट्रवादी व शिवसेना या दोन तुल्यबळ पक्षांमध्ये लढत दिसत असली, तरी या सरळ लढतीचे चित्र बदलून टाकील अशी उमेदवारी अजूनही जाहीर झाली नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना व काँग्रेस अशी सरळ लढत झाली असती, तर शिवसेनेला ती निवडणूक खडतर गेली असती. विखार अहमद खान यांनी बंडखोरी केल्याने व काँग्रेसची तब्बल ४५ हजार मते फोडल्याने जाधव यांचा विजय झाला. जे गणित विधानसभेला जुळले, तेच लोकसभेला जुळावे या दृष्टीने आमदार जाधव यांचे प्रयत्न आहेत. शिवसेनेला एमआयएमच्या उमेदवाराकडून अपेक्षा आहे. ही उमेदवारी प्रभावी राहिली तर लोकसभा निवडणूक सोपी जाईल, असा शिवसेनेचा कयास आहे.