26 September 2020

News Flash

कुकडी कारखान्यात जगताप यांची हॅटट्रिक

श्रीगोंदे तालुक्यातील कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतही सत्ताधारी जगताप गटाने विजयाची हॅटट्रिक नोंदवली.

| April 23, 2015 03:30 am

श्रीगोंदे तालुक्यातील कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतही सत्ताधारी जगताप गटाने विजयाची हॅटट्रिक नोंदवली. कारखान्यावर निर्विवाद वर्चस्व सिद्ध करताना आमदार राहुल जगताप यांच्या सहकार मंडळाने सर्व १९ जागा जिंकल्या. बबनराव पाचपुते व घनश्याम शेलार यांच्या कुकडी बचाव पॅनेलला एकही जागा जिकंता आली नाही. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस घनश्याम शेलार यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य अनिल वीर यांनाही पराभव पत्करावा लागला.
कारखान्याचे संस्थापक कुंडलिक जगताप व त्यांचे चिरंजीव तथा कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल जगताप हे दोघेही विजयी झाले. सहकार मंडळाचे सर्व उमेदवार तीन ते साडेतीन हजारांच्या मतांच्या फरकाने विजयी झाले.
बुधवारी सकाळी श्रीगोंदे येथील तुळशीदास मंगल कार्यालयात मतमोजणीस सुरुवात झाली. जगताप यांच्यासह त्यांचे सर्व उमेदवार फेरीपासून आघाडीवर होते. प्रत्येक फेरीमध्ये ही आघाडी वाढतच होती. निवडणुकीचा कल लक्षात येताच जगताप समर्थकांनी जल्लोष सुरू केला. ढोलताशाचा गजर व गुलालाची उधळण करीत फटाके फोडून आनंद साजरा केला.
निकालानंतर आमदार राहुल जगताप म्हणाले, सहकाराच्या खासगीकरणाचा डाव मतदारांनी ओळखला होता. विरोधकांनी उमेदवार मिळत नव्हते, दावा मात्र विजयाचा करीत होते. आता मतदारांनीच त्यांना यापुढे सहकारच्या निवडणुका लढवू नका असा संदेश दिला आहे. घनश्याम शेलार यांनी हा धनशक्तीचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.  
सहकार मंडळाचे विजयी उमेदवार- कुंडलिकराव जगताप (बिनविरोध) पिंपळगाव पिसा गट-
आमदार राहुल जगताप, अंकुश रोडे, धनाजी शिंदे. हिंगणी गट- बाजीराव मुरकुटे, निवृत्ती वाखारे, सुभाष वाघमारे. राजापूर गट- विवेक पवार, बाळासाहेब भोंडवे, मनोहर वीर. कोळगाव गट- प्रल्हाद इथापे, विनायक लगड. भानगाव गट- सुभाष डांगे, मोहन कुंदाडे. अनुसूचित जाती/जमाती- उत्तम शिंदे. महिला- ललिता उगले, लताबाई बारगुजे. इतर मागासवर्ग- विश्वास थोरात. भटक्या विमुक्त जाती व जमाती- सुखदेव तिखोले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2015 3:30 am

Web Title: jagtaps hattrick in kukadi sugar factory
टॅग Karjat
Next Stories
1 अपघाताचा बनाव करून तीन लाख लांबवले
2 शेक्सपिअरच्या ३७ नाटकांमध्ये ओळी किती?
3 राहुल गांधी बालीश -उमा भारती
Just Now!
X