‘जय महाराष्ट्र’ म्हणाल तर सदस्यत्व रद्द करू पाहणाऱ्या कर्नाटकच्या दुष्काळी भागातील जनतेला पिण्यासाठी कोयना, वारणा धरणातून दोन दिवसापासून पाणी सोडण्यात येत असून दर सेकंदाला १ हजार ४०० घनफूट पाणी राजापूर धरणातून कर्नाटकसाठी देण्यात येत आहे. गेल्या महिन्यात २.३१ टीएमसी पाणी दिल्यानंतर पुन्हा आता अडीच टीएमसी पाणी देण्यात येत आहे.

कर्नाटकच्या सीमावर्ती भागात मराठी भाषक मोठय़ा प्रमाणात वास्तव्यास आहेत. या मराठी बांधवांकडून जाणीवपूर्वक मराठीचा वापर होत असताना  ‘जय महाराष्ट्र’ हा शब्द रूळला आहे. आणि नेमकी हीच बाब कन्नडिगांना डाचत आहे. या विरूध्द कोल्हापूरसह सांगली, सोलापूरमध्ये तीव्र पडसाद उमटले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत हस्तक्षेप करीत केंद्र शासनाकडे दाद मागण्याचे सूतोवाच केले.

सीमाभागाला पाण्याचा मुख्य स्रोत असलेली कृष्णा नदी कोरडी पडली असल्याने सीमाभागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने गेल्या महिन्यात कर्नाटकने पाणी सोडण्याची विनंती महाराष्ट्राला केली होती. या विनंतीवरून मार्च-एप्रिलमध्ये २.३१ टीएमसी पाणी सोडण्यात आले. मात्र उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पुन्हा पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे पुन्हा अडीच टीएमसी पाणी सोडण्याची मागणी कर्नाटकने केली असून गेल्या तीन दिवसापासून कोयना व वारणा धरणातून कर्नाटकातील सीमा भागासाठी पाणी सोडण्यात आले आहे.

कोयना धरणातून ३ हजार २७० आणि वारणा म्हणजेच चांदोली धरणातून ७५१ घनफूट प्रतिसेकंद या वेगाने पाणी सोडण्यात येत असून कोल्हापूर जिल्ह्यातील राजापूर बंधाऱ्यातून कर्नाटक हद्दीत दर सेकंदाला १ हजार ४०० घनफूट पाण्याचा विसर्ग कर्नाटकात होत आहे.

कोयना धरणामध्ये बुधवारी दुपापर्यंत १७.१९ आणि वारणा धरणात ४.५० टीएमसी पाणी साठा असून हे पाणी पावसाचा हंगाम सुरू होईपर्यंत पुरेसे असल्याचे सांगलीच्या जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी पाणी साठा समाधानकारक असून साठा ऑगस्टअखेर पुरेल या पध्दतीने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.  कर्नाटकला पाणी सोडत असताना जत आणि सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटला पाणी देण्याच्या बोलीवर पाणी सोडण्यात आले असून तशी तयारी कर्नाटकने दर्शवली आहे. मात्र यासाठी आवश्यक पायाभूत यंत्रणा महाराष्ट्रात उपलब्ध नसल्याने या बदली पाण्याचा वापर करता येत नाही. मात्र कर्नाटकला सोडण्यात आलेल्या पाण्याला मूल्य आकारले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून एक टीएमसी पाण्याचा दर कोटीच्या घरात जाण्याची शक्यता जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यानी व्यक्त केली.