गिरणी कामगारांना घरांचा ताबा द्या, उर्वरित घरांची लॉटरी काढा आणि गिरणीच्या जमिनी ताब्यात घेण्यात आल्या आहेत तेथे घरबांधणी सुरू करा, अन्यथा गिरणी कामगार आंदोलन छेडतील, असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार संघाच्या बैठकीत देण्यात आला.

पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात जिल्हाध्यक्ष दिनकर मसगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत गिरणी कामगारांच्या प्रश्नावर सरकार चालढकल करीत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.

गिरणी कामगारांच्या घरांची लॉटरी काढण्यास सरकार चालढकल करीत आहे. त्याबद्दल या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली.

गिरणींच्या जागी तयार असणारी घरे कामगारांना वाटप करा, गिरणीच्या ज्या जमिनींचा सरकारकडे ताबा आहे त्या ठिकाणी ताबडतोब घरबांधणीस सुरुवात करा, ज्या जमिनी ताब्यात आल्या नाहीत त्यांचा ताबा लवकर घ्या, असे ठरावदेखील करण्यात आले.

घरे लवकरात लवकर झाली नाहीत तर उग्र आंदोलन छेडण्यात येईल, तसेच पालकमंत्र्यांना घेराव घालून निवेदन देण्यात येईल. मुख्यमंत्र्यांना तत्पूर्वी निवेदन पाठविले जाईल.

या नंतरही गिरणी कामगारांच्या प्रश्नांकडे सरकारने लक्ष दिले नाही तर राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली जेलभरो आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला.

या वेळी जिल्हाध्यक्ष दिनकर मसगे यांच्या नेतृत्वाखाली कामगार, त्यांचे वारस आंदोलन छेडतील असे सांगण्यात आले.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आंदोलन करण्याची संधी द्या, असे सुभाष परब म्हणाले. सत्यवती मुळीक म्हणाल्या, मी आता ७० वर्षे वयाची आहे. मुंबईला जाऊ शकत नाही, पण आंदोलन छेडले गेल्यास जिल्ह्य़ात आंदोलन छेडून जिल्ह्य़ाच्या तुरुंगात जाण्याची तयारी आहे. जेलमध्ये बसून सरकारची पेज घेऊ, त्या वेळी उपस्थित सर्वानी पाठिंबा दिला.

गिरणी कामगारांचे नेतृत्व दिनकर मसगे योग्य पद्धतीने करीत असल्याचे सर्वानी जाहीर केले.

या वेळी राजेंद्र पडते, सुभाष परब, वामन सावंत, कृष्णा माघव, महादेव देसाई, मारीनोन फर्नाडिस, वैशाली चव्हाण, रवीना नाईक, आत्माराम नाईक, रवींद्र नाईक, राजश्री गवस, प्रकाश धुरी, सत्यवती मुळीक, सविता आरोलकर, प्रतिभा घोगळे, लवू गवस, विशाखा शिंत्रे, भिवा परब, वसंत गवस, केशव सावंत, अनंत सांगेलकर, स्मिता धाऊसकर, प्रेमानंद परब, महादेव देसाई, शंकर मुळीक, झिलू सावंत, रामचंद्र शिरोडकर आदी उपस्थित होते.