सततची नापिकी आणि त्यातून आलेली गरिबी या नैराश्यातून अनेक शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. अशा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीकरिता भारतीय जैन संघटना पुढे सरसावली आहे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च ही संघटना उचलणार आहे. या जिल्ह्य़ातील मुलांना यासाठी पुणे येथे पाठविण्यात येणार आहे.
या जिल्ह्य़ात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची ८६, तर गडचिरोली जिल्ह्य़ात ५ मुले आहेत. या सर्व मुलांना पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षणाचे माहेरघर असलेले पुण्यात मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. संपूर्ण मराठवाडय़ातून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या ३०० मुला-मुलींना पाचवी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी पुणे येथे आणले. संपूर्ण महाराष्ट्रातून १ जानेवारी २०१५ नंतर आत्महत्या केलेल्या ३३०० शेतकरी परिवारांना भेटी देऊन सव्‍‌र्हे करून त्यांच्या मुला-मुलींना शिक्षणासाठी आणण्याचा निर्णय भारतीय जैन संघटनेने घेतला आहे. त्यासाठी १३ जूनला स्थानिक जैन भवनात कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यात शासकीय सहकार्यही लाभणार आहे.
तत्पूर्वी प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन आत्महत्याग्रस्त कुटुंबामध्ये आणखी पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेत असलेली मुले आहेत का, याची पाहणी करण्यात येणार आहे.
यासाठी केंद्रीय नियोजन समितीचे आयोजन करण्यात आले असून चंद्रपूर व गडचिरोलीचे समन्वयक अशोक सिंघवी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका समन्वयक समिती स्थापन करण्यात आली. या पाहणीत आणखी विद्यार्थ्यांना समाविष्ट करण्यात येणार आहे. १३ जूनच्या कार्यक्रमानंतर जिल्ह्य़ातील सर्व विद्यार्थ्यांना पुण्यात पाठविण्यात येणार आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींना जास्तीत जास्त संख्येने शिक्षणासाठी पुण्यात पाठविण्यात आवाहन संस्थेचे संस्थापक शांतिलाल मुथ्था यांनी एका पत्रकातून केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jain organization help to suicides farmer kids education
First published on: 04-06-2016 at 00:49 IST