राज ठाकरे यांचा इशारा; मनसे मांसविक्री बंदी जुमानणार नाही ’भाजपवर राजकारणाचा आरोप
महाराष्ट्र म्हणजे गुजरात नाही, येथे काय करायचे ते जैन लोकांनी ठरवायचे नाही, असा सणसणीत दम पर्युषण काळातील मांस विक्री बंदीच्या मुद्दय़ावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. मी यापूर्वीही इशारा दिला होता. नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या जीवावर हे डोकी वर काढणार. आपल्या प्रत्येक गोष्टीत हे शिरणार. पर्युषणच्या काळातील मांस विक्री बंदी ही केवळ सुरुवात असून यामागे भाजपचे राजकारण असल्याची टीकाही राज यांनी केली.
‘भारतीय जनता पार्टी’ हा खरेतर ‘भारतीय ‘जंत’ पार्टी’ आहे. हा पक्ष घाणीत कुठेही वळवळू शकतो, असा टोलाही राज यांनी लगावला. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मतपेटीवर डोळा ठेवून भाजप-सेनेचे राजकारण सुरू झाले आहे. हे विष पेरण्याचे काम भाजपने केले असून आज पर्युषणाच्या नावे जैनांच्या भावना लक्षात घेऊन मांस विक्री बंदी लागू करणार असाल, तर उद्या श्रावण, गणेशोत्सव आणि त्यानंतर येणाऱ्या नवरात्रोत्सवातही ही बंदी लागू करणार का, असा सवाल राज ठाकरे यांनी वांद्रे येथे रंगशारदामध्ये पत्रकार परिषदेत केला.
मुंबई, ठाणे व कल्याण-डोंबिवली येथील मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा राज यांनी आयोजित केला होता. त्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना मनसे मांस विक्री बंदी मानत नाही. मानणार नाही असे सांगून आवश्यक असल्यास मांस विक्रेत्यांना मनसे संरक्षण देईल, असे राज म्हणाले. उद्या रमझानच्या निमित्ताने हॉटेल बंद ठेवण्याची मागणी होईल, तेव्हा काय करणार, असा प्रश्न उपस्थित करत, खरेतर कोणताच दिवस पाळण्याचे काही कारण नसल्याचे त्यांनी सांगितले. जैन धर्मीयांचे दिगंबर साधू नग्न अवस्थेत फिरत असतात. त्याबद्दल अनेक तक्रारी आहेत, असे सांगून अनेक जैन विकासकांच्या इमारतीत मराठी माणसाला घरे दिली जात नसल्याकडे राज यांनी लक्ष वेधले.
आणीबाणीनंतरच्या जनता पार्टीप्रमाणे सध्या राज्यातील कारभार सुरू आहे. शिवसेना-भाजपमध्ये विस्तव जात नाही. भाजप अंतर्गतही कोणाचे कोणाशी पटत नाही. निवडणुकीपूर्वी ज्या घोषणा केल्या त्याची अंमलबजावणी आज केली जात नाही, तर केवळ समित्या नेमून लोकांना मूर्ख बनविण्याचे उद्योग सुरू आहेत. नरेंद्र मोदी परदेशात जातात म्हणून देवेंद्र फडणवीस हेही सारखे परदेशात जातात. गुंतवणुकीच्या केवळ घोषणा केल्या जातात आणि त्याच रवंथ करण्याचे काम पुढे केले जाते. मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया हे उत्तम काम करत होते. लवकरच ते बढतीसाठी पात्र होणार होते. अशावेळी त्यांना अचानक का काढण्यात आले ते स्पष्ट होत नाही. शीना बोरा चौकशी प्रकरणाचे कारण यासाठी दिले जाते. हे जर खरे असेल तर मग त्यांना बदलल्यानंतर त्यांच्याकडेच या तपासाची सूत्रे का सोपविण्यात आली, असा सवाल करत सरकारमध्ये काय चालले आहे तेच कळत नाही, असे राज म्हणाले.