जिल्ह्य़ात ५ मतदारसंघांमधील १ हजार ५६८ केंद्रांवर मतदान होणार असून त्यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. जिल्ह्य़ात ४० मतदान केंद्रे संवेदनशील आहेत.
नाशिक, औरंगाबाद, नागपूर रेल्वे, पोलीस प्रशिक्षण विद्यालय (जालना) व नागपूरचे राज्य राखीव पोलीस व पोलीस कर्मचारी वर्ग बंदोबस्तासाठी तैनात आहे. जालना येथील राज्य राखीव पोलीस बलाची कंपनी, तसेच मणिपूर, छत्तीसगढ, पंजाब आदी ७ ठिकाणची निमलष्करी दले मतदानाच्या दिवशी तैनात असतील. याशिवाय जिल्हा पोलीस दलातील ५ उपअधीक्षक, १६ निरीक्षक, ७४ सहायक व उपनिरीक्षक, १ हजार २८० कर्मचारी यांच्याव्यतिरिक्त गृहरक्षक दलाचे ४५० जवान बंदोबस्तासाठी असतील.
पाचही मतदारसंघांत मतदान व मतमोजणी प्रक्रियेसाठी जवळपास ८ हजार अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले आहेत. १ हजार ९९३ मतदान यंत्रांची व्यवस्था आहे. जिल्ह्य़ात एकूण मतदार संख्या १३ लाख ८९ हजार ३२ असून, १ हजार ५५८ सैनिक मतदार आहेत. सर्वाधिक २ लाख ९४ हजार २६४ मतदार जालना मतदारसंघात, तर सर्वात कमी २ लाख ६७ हजार २७७ मतदार भोकरदनमध्ये  आहेत. घनसावंगी २ लाख ८३ हजार ५८२, परतूर २ लाख ६७ हजार ५४९ व बदनापूर २ लाख ७६ हजार ३८० अशी मतदार संख्या आहे.
६९ केंद्रे अतिसंवेदनशील
आचारसंहिता भंगाचे
परभणीमध्ये ८५ गुन्हे
वार्ताहर, परभणी
प्रचार थांबल्यानंतर जिल्हा प्रशासनाने मतदानाच्या तयारीला वेग दिला आहे. जिल्हाभरात १ हजार ३४८ केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी ९ हजार ७४ अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हाभर ६९ केंद्रे अतिसंवेदनशील असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांनी दिली.
निवडणूक काळात आचारसंहिता भंगाचे आतापर्यंत ८५ गुन्हे दाखल झाले. यात सर्वाधिक ११ गुन्हे गंगाखेडमध्ये दाखल झाले. भरारी पथकांसह विविध पोलीस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांनी दारुबंदीअंतर्गत १२७ गुन्हे दाखल केले. यात २९ लाख ६२ हजार २४३ रुपयांच्या दारूसह मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला, तर १८ लाख ९० हजार २५० रुपये विविध ठिकाणी जप्त केले. यात १६ गुन्हे नोंदविण्यात आले. इतरही ४ लाख ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
जिंतूरमध्ये २२, परभणी २०, गंगाखेड १२, तर पाथरीत १५ अशी जिल्हाभर ६९ अतिसंवेदनशील मतदान केंद्रे आहेत. जिल्हा प्रशासनाने १ हजार ३४८ केंद्रांवर ५ हजार ९८४ मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. अधिकाऱ्यांसह ९ हजार ७४ कर्मचारी काम पाहत आहेत. या कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिका पाठविण्यात आली. मतदानाची टक्केवारी वाढावी, या साठी स्विप २अंतर्गत विशेष मोहिमा राबविण्यात आल्या. त्यामुळे टक्केवारी वाढेल, असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला.
प्रत्येक उमेदवाराला केवळ तीन वाहने मतदानाच्या दिवशी वापरता येतील. मतदारांची ने-आण करण्यासाठी उमेदवारांना वाहनाचा वापर करता येणार नाही. असे आढळून आल्यास तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल होतील, असे सिंह यांनी स्पष्ट केले.