विधानसभा निवडणुकीत जिल्हय़ात झालेल्या एकूण मतदानात २९.२२ टक्के मते घेऊन भाजप प्रथम क्रमांकावर आहे. त्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावरील २२.८२ टक्के मते राष्ट्रवादीला मिळाली आहे. १८.३६ टक्के मतदान झालेल्या शिवसेनेचा क्रमांक तिसरा असून ११.२६ टक्के मते मिळवून काँग्रेस चौथ्या क्रमांकावर आहे.
जिल्हय़ात भाजपचे तीन उमेदवार निवडून आले असून ऐनवेळी पक्षाच्या तिकिटावर उभे राहिलेले जालना आणि घनसावंगी येथील उमेदवार पराभूत झाले आहेत. भाजपच्या जिल्हय़ातील वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीत या दोन्ही उमेदवारांना वैयक्तिक वाटाही आहे. जालना मतदारसंघात ऐनवेळी भाजपकडून उभे राहिलेले जिल्हय़ातील राष्ट्रवादीचे नेते अरविंद चव्हाण यांना ३७ हजारांपेक्षा अधिक मते मिळाली. या मतदारसंघात शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि बसपामध्ये अटीतटीची लढत झाली. एकूण मतदानात २५.३३ टक्के मते मिळविणारे शिवसेनेचे अर्जुन खोतकर निवडून आले. पराभूत उमेदवारांत काँग्रेसचे कैलास गोरंटय़ाल यांना २५.१७ टक्के, भाजपचे अरविंद चव्हाण यांना २१.१२ टक्के तर बसपाचे अब्दुल रशीद यांना २०.४३ टक्के मते मिळाली.
घनसावंगीत ९८ हजारांपेक्षा अधिक मते घेणारे राष्ट्रवादीने राजेश टोपे यांच्या मतांची एकूण मतदानातील टक्केवारी ४५.८८ एवढी आहे. दुसऱ्या क्रमांकावरील भाजप उमेदवार यांच्या मतांची टक्केवारी २५.५३ टक्के आहे. २१.३६ टक्के मते घेणारे शिवसेनेचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
बदनापूरमध्ये भाजपचे विजयी उमेदवार नारायण कुचे यांना ३९.२१ टक्के मते मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादीस २६.६८ टक्के तर तिसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेस १६.४९ टक्के मतदान झाले. भोकरदन मतदारसंघात ३५.१८ टक्के मतदान घेणारे भाजपचे संतोष दानवे विजयी झाले. मागील तीन निवडणुकांत सलग विजय मिळविणारे चंद्रकांत दानवे पराभूत झाले असून त्यांच्या मतांची टक्केवारी ३१.३८ टक्के आहे. परतूरमधील भाजपने २६.९८ टक्के मिळवून विजय मिळविला असून २२.३६ टक्के मते मिळवून काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे.
जालना येथे शिवसेनेस विजय मिळाला असला तरी भोकरदन, बदनापूर आणि घनसावंगी येथे हा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर असून परतूरमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. जिल्हय़ात काँग्रेसला जी ११.२६ टक्के मते मिळाली. त्यात प्रामुख्याने जालना आणि परतूरमधील मतांचा वाटा आहे. जालना मतदारसंघात काँग्रेसला ४४७८२ तर परतूरमध्ये ४२४६६ मते मिळाली. काँग्रेसच्या उमेदवारास घनसावंगी मतदारसंघात २७६२, बदनापूरमध्ये १३००७ तर भोकरदनमध्ये ५२१३ एवढी कमी मते मिळाली आहेत. राष्ट्रवादीस परतूर मतदारसंघात ४७५८ तर जालना मतदारसंघात १६११ एवढी अल्प मते मिळाली. जिल्हय़ात ७६४६ मतदारांनी ‘नोटा’चा वापर केला.
६२ उमेदवारांची अनामत जप्त
जालना जिल्हय़ातील एकूण ७७ पैकी ६२ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या दोन, काँग्रेसच्या तीन उमेदवारांचा समावेश आहे. भाजपच्या पराभूत झालेल्या दोनपैकी एकाही उमेदवाराची अनामत जप्त झालेली नाही.