22 September 2020

News Flash

महिलांचा भार हलका करण्यासाठी ‘जलदूत’

रणरणत्या उन्हात डोक्यावर हंडा-कळशी घेऊन पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या महिला हे ग्रामीण भागात सर्वदूर दिसणारे विदारक चित्र बदलविण्यासाठी नाशिकच्या बाल वैज्ञानिकांनी पुढाकार घेतला आहे.

| May 11, 2014 03:17 am

नाशिकच्या बाल वैज्ञानिकांचा आविष्कार
रणरणत्या उन्हात डोक्यावर हंडा-कळशी घेऊन पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या महिला हे ग्रामीण भागात सर्वदूर दिसणारे विदारक चित्र बदलविण्यासाठी नाशिकच्या बाल वैज्ञानिकांनी पुढाकार घेतला आहे. सहजपणे पाणी आणण्याची व्यवस्था सौरऊर्जेवर चालणाऱ्या ‘जलदूत’ या अभिनव वाहनाद्वारे बालवैज्ञानिकांनी तयार केली आहे.
वाढत्या तापमानाबरोबर राज्यातील बहुतांश भागात सध्या पाणी टंचाईचे चटके बसत आहेत. पाणी आणण्यासाठी लागणारे हे कष्ट कमी करण्याच्या उद्देशाने संडे सायन्स स्कूलने या यंत्रणेची संकल्पना मांडली. नाशिक विज्ञान प्रबोधिनी या संस्थेतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘संडे सायन्स स्कूल’ उपक्रम राबविला जातो. त्या अंतर्गत वार्षिक प्रकल्पांतर्गत स्वप्नील राजगुरू, निलकंठ शिर्के, विनीत जगताप, निलय कुलकर्णी, दीपक नेरकर, श्रेणीक मानकर, विराज पवार या इयत्ता आठवी ते दहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गटाने पाण्याची टाकी बसविलेल्या या वाहनाची निर्मिती केली आहे.
सौर ऊर्जेद्वारे दोन ते अडीच तासात वाहनाची ‘बॅटरी’ एकदा ‘चार्ज’ झाल्यावर १८ ते २० किलोमीटर अंतर ते मार्गक्रमण करू शकते. पाणी वाहून नेताना बॅटरी चार्ज होण्याची प्रक्रिया सुरू राहते. यामुळे दिवसभर पाणी आणण्यासाठी या वाहनाचा वापर करता येऊ येईल, असे स्कूलचे प्रदीप व चैताली नेरकर यांनी सांगितले. संस्थेतर्फे आयोजित विज्ञान महोत्सवात विद्यार्थ्यांनी निर्मिलेल्या या अभिनव वाहनाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. फळबागा व तत्सम पिकांना भारनियमनाच्या काळात पाणी देण्यासाठी या वाहनाचा तंत्रज्ञानात काही बदल करुन वापर येऊ शकेल. त्यासाठी अधिक क्षमतेची पाण्याची टाकी, मोटार व तत्सम साहित्याचा वापर करावा लागेल.

काय आहे जलदूत?
जलदूत म्हणजे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे चार चाकी वाहन. त्यात २०० लिटर पाण्याची टाकी बसविलेली आहे. जलदूतच्या सहाय्याने कोणीही अगदी कमी श्रमात पाणी भरून आणू शकते. वाहनाच्या नियंत्रणासाठी छोटेखानी नियंत्रक आहे. त्याद्वारे वाहन पुढे-मागे नेणे अथवा वळविता येते. त्यात १०० वॉट क्षमतेचे सोलर पॅनल, १०० वॉटची मोटार, दोन बॅटरीज, ‘चार्ज कंट्रोलर’, दूर नियंत्रक, सायकलची चार चाके व इतर काही सुटे भाग यांचा वापर करण्यात आला आहे. साधारणत: १५ हजार रुपये त्यासाठी खर्च आला. विद्यार्थी वाहनात आणखी काही सुधारणा करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2014 3:17 am

Web Title: jaldoot by child scientists in nashik
टॅग Nashik
Next Stories
1 दोघांना अटक, १३ पर्यंत पोलीस कोठडी
2 १२९ जवानांची तुकडी सैन्यात दाखल
3 कोळसा खाण वाटपप्रकरण नागपूर,यवतमाळ मुंबईत छापे
Just Now!
X