X
X

जळगावात ‘फॉरेनची सुनबाई’! शेतकऱ्याच्या मुलाने अमेरिकन तरुणीशी बांधली लग्नगाठ

सध्या जळगावमध्ये याच लग्नाची चर्चा आहे

प्रेमाला कसलंच बंधन नसतं असं म्हणतात. वय, देशांच्या सीमा यासारखे अडथळे ओलांडून प्रेम यशस्वी केल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशाच उदाहरणांमध्ये जळगावमधील एका तरुणाच्या प्रेमकथेची भर पडली आहे. या तरुणाचे नाव आहे योगेश माळी. शेतकरी कुटुंबातील योगेशने काही दिवसांपूर्वीच जळगावमध्ये मोठ्या थाटामाटात एका अमेरिकन तरुणीशी मराठमोळ्या पद्धतीने लग्न केलं. विशेष म्हणजे फेसबुकवरुन झालेली ओळखीचे रुपांतर आता पती-पत्नीच्या नात्यात झालं आहे.

सॉफ्टवेअर इंजिनियर असणाऱ्या योगेशचे बालपण जळगाव आणि पुण्यातच गेले. योगेशने प्राथमिक शिक्षण विद्यानिकेतन शाळेमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पुण्यातील शासकीय महाविद्यालयातून त्याने अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं. कंप्युटरमध्ये एमएस पदवी योगेशने घेतली. त्यानंतर आपल्या शिक्षणाच्या जोरावर तो अमेरिकेत नोकरीला गेला. तिथेच योगेशची फेसबुकवरुन अॅना रेनवॉल या तरुणीशी ओळख झाली. त्यानंतर ते वरचेवर एकमेकांशी बोलू लागले त्यांच्यात चांगली मैत्री झाली. हळूहळू ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनी प्रेमाची कबुली दिली. त्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. सोशल नेटवर्किंग मार्केटींगमध्ये कार्यरत असणाऱ्या अॅनाने योगेशबद्दल घरच्यांना कल्पना दिली. त्यानंतर दोघांनी आपल्या कुटुंबियांना विश्वासात घेऊन याबद्दल सांगितले. दोन्ही कुटुंबियांनी घेतलेल्या निर्णयानुसार अॅना तिच्या कुटुंबासहित जळगावला आली. त्यानंतर या दोघांनी लग्नगाठ बांधली. भारतीय संस्कृतीबद्दल कुतूहल असल्याने अॅनाने आणि तिच्या कुटुंबाने जळगावमध्ये येऊन भारतीय पद्धतीने लग्न करण्यास होकार दिला.

अॅना लग्नाआधी काही दिवस जळगावला राहिली. तिने भारतीय परंपरेनुसार आपल्या राहणीमानात बदल केला. भारतीय पेहराव, घरातील कामे, नातेवाईकांच्या गाठीभेटी अशा अनेक गोष्टीं अॅनाने पहिल्यांदाच अनुभवल्या. ती माळी कुटुंबात चांगलीच रमली. त्यानंतरची अॅना आणि तिच्या आई-वडीलांनी लग्नाला होकार दिला. २३ फेब्रुवारी रोजी मोठ्या थाटामाटात माळी कुटुंबाने आपल्या फॉरेनच्या सुनबाईला कायमचे आपलेसे केले. सध्या जळगावमध्ये याच लग्नाची चर्चा आहे.

22
X