तब्बल नऊ वर्षांपासून सुरू असलेला काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रा. व्ही. जी. पाटील खून खटला निकाली निघाला असून राजू सोनवणे या प्रमुख आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेप ठोठावली आहे. इतर चार आरोपींसंदर्भात आठ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
२००५ मध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना प्रा. पाटील यांची २१ सप्टेंबर रोजी सकाळी येथील मानराज पार्कजवळ हत्या करण्यात आली होती. मारेकऱ्यांनी हेल्मेट घातलेले होते. हत्येनंतर चार दिवसांनी २५ सप्टेंबर रोजी राजू सोनवणे, राजू माळी यांना अटक करण्यात आली. या हत्याकांडातील इतर संशयित दामोदर लोखंडे, लिलाधर नारखेडे यांना ऑक्टोबर २००५ मध्ये अटक करण्यात आली. २२ डिसेंबर रोजी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून पहिले दोषारोप पत्र न्यायालयात सादर करण्यात आले. खटल्याची जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू झाली असता महेंद्र महाजन आणि रामभाऊ पवार या दोन प्रत्यक्षदर्शीची साक्ष अत्यंत महत्वपूर्ण ठरली. सुनावणीदरम्यान न्यायालयात महाजन यांनी राजू सोनवणे आणि राजू माळी हेच मारेकरी असल्याचे ओळखले. मारेकऱ्यांनी हत्येसाठी वापरलेली मोटारसायकल भुसावळ रेल्वे स्थानकाजवळ पोलिसांना आढळून आली होती. गुन्ह्णाात वापरलेला चाकूही पोलिसांनी हस्तगत केला होता. न्यायालयीतील कामकाजादरम्यान साक्षीदारांनी या वस्तू ओळखल्या. प्रा. पाटील यांच्या अंगावरील जखमा चाकुच्या असल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला होता. हे पुरावे न्यायालयात ग्राह्णा धरण्यात आले.
प्रा. पाटील यांच्या पत्नी रजनी पाटील यांनी या प्रकरणात अन्यही काही जणांवर संशय व्यक्त केला होता. न्यायालयात त्यांनी वारंवर त्याविषयी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आला होता. रजनी पाटील यांच्या मागणीनंतर तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला होता. या घटनेत तीन वेगवेगळ दोषारोपपत्र दाखल झाले होते. संपूर्ण खटल्यात न्यायालयाने ४६ साक्षीदारांची तपासणी केली. प्रमुख मारेकरी राजू सोनवणे यास न्या. डी. जे. शेगोकार यांनी जन्मठेप ठोठावली. या खटल्यातील अजून एक आरोपी राजू माळी याचा मृत्यू झाला आहे.