जळगाव पालिका घरकुल घोटाळ्यातील ४० संशयितांची नावे पुराव्याअभावी खटल्यातून वगळण्यास येथील विशेष न्यायालयाने मंजुरी दिली. परंतु, यातील कोणाविरुद्धही पुरावा आढळल्यास त्याविरुद्ध पोलीस पुन्हा आरोप दाखल करू शकतील, असेही आदेशात म्हटले आहे.
घरकुल घोटाळ्याचे कामकाज न्या. आर. आर. कदम यांच्या न्यायालयात झाले. या घोटाळ्याचे तपास अधिकारी जळगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत बच्छाव यांनी २९ एप्रिल २०१४ रोजी न्यायालयात अर्ज सादर केला होता. या अर्जात त्यांनी घोटाळ्यातील तत्कालीन ४० नगरसेवकांविरुद्ध पुरावा नसणे, गुन्ह्य़ात सहभागासाठी संशयास्पद पाश्र्वभूमी नसणे या कारणाने त्यांची मुक्तता करावी, असे नमूद केले होते. हे ४० जण १९९६ ते २००२ या कालावधीत म्हणजे गुन्हा घडला त्यादरम्यान नगरसेवक अथवा अन्य कोणत्याही पदावर नव्हते, असेही तपास अधिकाऱ्यांनी अर्जात नमूद
केले होते.
ही मागणी  न्या. कदम यांच्या न्यायालयाने स्वीकारत ४० संशयितांची नावे वगळण्यास मंजुरी दिली. खटल्यातून सुटका झालेल्यांमध्ये संजय चौधरी, भगवान सपकाळे, विष्णू भंगाळे, शरद तायडे आदींसह ४० जणांचा समावेश आहे. या प्रकरणात माजी आमदार सुरेश जैन, माजी मंत्री गुलाबराव देवकर हे अद्याप
तुरुंगात आहेत.