जळगाव जिल्ह्यात परीक्षा केंद्रात दहावीचा इंग्रजी विषयाच्या पेपर सुरु होण्यापूर्वी एकाने चार जणांवर चाकूने हल्ला केल्याची घटना गुरुवारी घडली. या हल्ल्यात चार जण जखमी झाले असून भीतीच्या सावटाखालीच विद्यार्थ्यांनी पेपर सोडवला.

यावल तालुक्यातील बामणोद येथील पीएसएमएस हायस्कूल या दहावीच्या परीक्षा केंद्रावर गुरुवारी इंग्रजीच्या पेपरसाठी परिक्षार्थी आले होते. यादरम्यान निखील रवींद्र सपकाळे (वय २२) याने एका परीक्षार्थीस परीक्षा केंद्रात सोडल्यानंतर दरवाजा बंद केल्यावरून वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. यादरम्यान निखीलने स्वत:कडील छोटा चाकू काढत त्यांच्यावर हल्ला केला. यात रुपेश गुणवंत ननावरे (१९), मोहित गोपाळ सोनवणे (१८), सौरभ सोनवणे, गौरव अरुण सोनवणे (१५) हे जखमी झाले. परीक्षा केंद्रात झालेल्या या हाणामारीमुळे गोंधळ निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच फैजपूरचे एपीआय दत्तात्रय निकम यांनी आरोपीला ताब्यात घेतले. मात्र या प्रकाराने अन्य परीक्षांर्थींच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे परीक्षा केंद्रांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.