जळगाव मनपा निवडणूक
जळगाव महानगरपालिकेसाठी रविवारी झालेल्या मतदानानंतर आज सोमवार झालेल्या मतमोजणीत सुरेश जैन याच्या खान्देश विकास आघाडीने सर्वाधिक ३३ जागा जिंकल्या, परंतु सत्तास्थापनेसाठी बहुमताचा आकडा ३६ असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने पंधारा जागांवर विजय मिळविला आहे. महत्वाचे म्हणजे यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार मुसंडी मारत १२ जागा जिंकल्या आहेत. मतमोजणीनंतर मिळालेल्या माहितीनुसार मनसे तिसऱया क्रमांकाचा पक्ष म्हणून समोर आला आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेत मनसे किंगमेकरच्या भूमिकेत समोर आला आहे.
काल दिवसभरात एकून ५५ टक्के मतदान झाले होते. मागच्या वेळीचे पक्षीय बलाबल पाहता खान्देश विकास आघाडीने सर्वात जास्त ३२ जागांवर वर्चस्व प्रस्थापित केले होते. परंतु, सध्याची आकडेवारी पाहता सर्व पक्षांमध्ये जळगाव मनपासाठी चुरशीची लढत सुरू असल्याचे सुरुवातीला चित्र होते. तरीसुद्धा खान्देश विकास आघाडीने जळगाव मनपाच्या एकूण ७५ जागांपैकी ३३ जागांवर विजय प्राप्त केला. तसेच जनक्रांती पक्षाला दोन जागांवर यश मिळाले आहे.