सांगली-मिरज-कुपवाड व जळगाव महानगरपालिका निवडणूक तसेच वसई- विरार महानगरपालिकेच्या एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठी १ ऑगस्ट मतदान होणार आहे. तर ३ ऑगस्टला मतमोजणी होणार असून आजपासून संबंधित महापालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे.

राज्याचे निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी सोमवारी सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेची मुदत १३ ऑगस्ट २०१८ रोजी संपत आहे. सांगली महापालिकेत मतदारांची संख्या सुमारे ४ लाख २३ हजार ३६६ इतकी आहे. एकूण २० प्रभागातील ७८ जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी ३९ जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी ११, अनुसूचित जमातीसाठी १, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी २१ जागा राखीव आहेत.

जळगाव महानगरपालिकेची मुदत १९ सप्टेंबर रोजी संपत आहे. या भागात मतदारांची संख्या सुमारे ३ लाख ६५ हजार १५ इतकी आहे. एकूण १९ प्रभागातील ७५ जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी ३८ जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी ५, अनुसूचित जमातीसाठी ४, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी २० जागा राखीव आहेत.

वसई-विरार शहर महानगरपालिकेतील प्रभाग क्र. ९७ च्या रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीसाठीदेखील १ ऑगस्ट रोजी मतदान होईल. या सर्व ठिकाणी दि. ४ जुलैपासून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यास सुरुवात होईल. १ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी ३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल असेही सहारिया यांनी सांगितले.

निवडणूक कार्यक्रम

नामनिर्देशनपत्रे दाखल करणे : ४ ते ११ जुलै २०१८

नामनिर्देशनपत्रांची छाननी : १२ जुलै २०१८

उमेदवारी मागे घेणे : १७ जुलै २०१८ पर्यंत

निवडणूक चिन्ह वाटप : १८ जुलै २०१८

मतदान : १ ऑगस्ट २०१८

मतमोजणी : ३ ऑगस्ट