नाराज खडसेंची महाजनांकडून मनधरणी

जितेंद्र पाटील, जळगाव</strong>

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये ‘महाविकास आघाडी’चा प्रयोग राबविण्याच्या दृष्टीने काँग्रेससह राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या हालचाली गतिमान झाल्या असताना जळगाव जिल्हा परिषदेतील आपली सत्ता कायम राखण्यासाठी भाजपला मोठी कसरत करावी लागण्याची चिन्हे आहेत. कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्य़ावरील आपला प्रभाव टिकविण्यासाठी विशेषत: भाजप नेते गिरीश महाजन यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पंचायत समित्यांच्या सभापतींची निवड प्रतिष्ठेची केली आहे.

जिल्हा परिषदेत बहुमताच्या जवळ असलेल्या भाजपला आपली सत्ता स्थापित करण्यासाठी गेल्या वेळी काँग्रेसची मदत झाली होती. त्याबदल्यात भाजपने काँग्रेसला एका विषय समितीचे सभापतिपददेखील बहाल केले होते. त्यानुसार या वेळीही काँग्रेसला सभापतिपदाची संधी देऊन आपली सत्ता टिकविण्याचे प्रयत्न भाजपकडून होत आहेत. मात्र काँग्रेसने आपली महत्त्वाकांक्षा नियंत्रणात ठेवून राज्याप्रमाणे जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याने भाजपची चिंता वाढली आहे. काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्यांची एकत्रित बैठक नाशिकचे माजी आमदार तथा पक्ष निरीक्षक अनिल आहेर यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली. त्यात झालेल्या चर्चेनंतर काँग्रेस पाठिंबा देण्याबाबत कोणता निर्णय घेईल, त्यावर जिल्हा परिषदेतील सत्तेचे गणित अवलंबून असणार आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचा कोणताच प्रयोग राबविला जाणार नाही. भाजप आणि काँग्रेस यांचीच सत्ता कायम राहील, असा दावा भाजपचे नेते, पदाधिकारी करीत आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याकडील प्रत्येकी एक सदस्य अपात्र आहे. त्यामुळे सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यांना बहुमतासाठी ३३ ही संख्या गाठता येणे शक्य नाही, हे लक्षात घेऊन भाजप नेते सत्ता कायम राखण्याचा आत्मविश्वास बाळगून आहेत. मात्र, सेना तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे पक्ष चमत्कार होण्याच्या आशेतून जोमाने कामाला लागले आहेत. येत्या ३ जानेवारीला अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची तसेच २ जानेवारीला पंचायत समित्यांच्या सभापतींची निवड होणार आहे.

खडसे समर्थकांचा वेगळा गट?

जिल्हा परिषदेत सद्य:स्थितीत भाजपचे सर्वाधिक ३३ सदस्य असले तरी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नाराजीमुळे त्यांचे समर्थक असलेले अनेक जिल्हा परिषद सदस्य वेगळा गट स्थापन करून बंड पुकारण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. खडसे समर्थकांनी ऐन वेळी दगाफटका केल्यास भाजपच्या हातातून सत्ता जाऊ शकते. या भीतीने भाजप नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. खुद्द गिरीश महाजन यांनी त्यासाठी नाराज खडसे यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे. खडसेंनी मनावर घेतले तरच जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता कायम राहू शकणार आहे. त्यामुळे भाजपचे जिल्ह्य़ातील राजकारण पुन्हा एकदा खडसे यांच्यावर केंद्रित झाले आहे.

एकनाथ खडसे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याशी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समित्यांच्या सभापती निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा केली जाईल. तसेच पक्षाची बैठकही आयोजित करण्यात येईल. जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता कायम राहणार आहे.

– गिरीश महाजन (भाजप नेते)