अन्नातून विषबाधा झाल्याने एखाद्याचा मृत्यू झाल्याच्या बातम्या अनेकदा वाचनात येतात. मात्र जळगावमध्ये शेतातील कच्ची मेथीची भाजी खाल्ल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या महिलेने खाल्लेल्या मेथीवर किटकनाशके फवारली होती. त्यामुळेच विषबाधा होऊन तिचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालामध्ये समोर आले आहे. या प्रकरणामुळे फळभाज्यांवर फवारल्या जाणाऱ्या किटकनाशकांमुळे होणाऱ्या विषबाधेचा मुद्दा नव्याने चर्चेत आला आहे.

जळगावमधील धरणगाव येथे राहणाऱ्या अंजूबाई पाटील यांनी शेतामधील मेथीची भाजी घरी आणून ती खाल्ली. त्यानंतर अचानक त्यांचा मृत्यू झाला. जवळच्या रुग्णालयात त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालामध्ये विषबाधा झाल्याचे अंजूबाईंचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अंजूबाई पाटील यांचे शवविच्छेदन झाले असून प्राथमिक अहवालात त्यांच्या शरिरामध्ये किटकनाशकांचा अंश अढळून आला. पुढील चाचण्यांसाठी धुळ्यातील मेडिकल कॉलेजमध्ये शविविच्छेदनासंदर्भातील नमुणे पाठवण्यात आले असून यासंदर्भातील सविस्तर अहवाल एक ते दीड महिन्यांमध्ये येईल.

अंजूबाई यांनी ज्या शेतातली भाजी खाल्ली तेथे चार दिवसापूर्वीच किटकनाशकांची फवारणी झाली होती. त्यामुळेच भाजी न धुता कच्चीच खाल्ल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. अंजूबाईंच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार अंजूबाईंबरोबरच इतर महिलांनाही शेतातील भाजी घरी आणली होती. आम्ही सर्वांनी ती घरी आणून धुवून खाल्ली पण अंजूबाईंनी ती धुतली की नाही याची आपल्याला कल्पना नाही अशी माहितीही या महिलेने दिली.

का झाले असे?
पिकांवर करण्यात येणारी औषधांची फवारणी आणि त्यांच्या काढणीमध्ये असणाऱ्या वेळेला प्रतिक्षा कालावधी असे म्हणतात. हा कालावधी फवारण्यात आलेल्या औषधांनुसार वेगवेगळा असतो. या कालावधीचे पालन केले नाही तर भाज्यांमधून विषबाधा होण्याची शक्यता असल्याचे कृषीतज्ञ सांगतात. अंजूबाईंनी ज्या शेतातील भाजी खाल्ली तेथे चारच दिवसापूर्वी औषधांची फवारणी झाल्याने किटकनाशकांचा अंश त्यांनी खाल्लेच्या भाजीबरोबर पोटात गेल्याने त्यांचा मृत्यू ओढावला. त्यातही भाजी कच्चीच खाल्ल्याने या किटनकनाशकांचा थेट परिणाम त्यांच्या शरिरावर झाला.

काय काळजी घ्याल
भाज्या बाजारातून आणल्यानंतर त्या स्वच्छ धूवून घ्यायला हव्यात. कारण या भाजांची लागवड कोणत्या प्रकारच्या पाण्यात झाली, त्यावर कोणती औषधे फवारली गेली आहेत याची ग्राहक म्हणून आपल्याला काहीच कल्पना नसते. आपण बाजारातून किंवा मॉलमधून आणलेल्या भाज्या स्वच्छ धूवून घेणे गरजेचे असल्याचे आहारतज्ञांचे म्हणणे आहे. आजकाल मुंबईसारख्या शहरांमध्ये रेल्वे रुळांलगतच्या जागेत भाजीची पिके घेतली जातात. त्यासाठी बाजूच्या नाल्यांमधली किंवा गटारांमधील सांडपाणी वापरले जाते. त्यामुळेही विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही आहारतज्ञ म्हणतात. म्हणूनच घरात आणलेली प्रत्येक भाजी आणि फळे धुवूनच त्यांचे सेवन केलेले फायद्याचे ठरते.