महाविकासआघाडी सरकारमधील राज्यमंत्री शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या राजीनामा प्रकरणानंतर, आता महाविकासआघाडी सरकारमधील एक प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसला देखील धक्का बसण्याची चिन्ह आहेत. कारण, काँग्रेसचे जालनामधील आमदार कैलास गोरंट्याल हे देखील राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. मंत्रिपद डावलण्यात आल्याने कैलास गोरंट्याल नाराज असून, यामुळेच ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.

या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या समर्थकांची बैठक देखील बोलावली आहे. कार्यकर्ते व समर्थकांशी चर्चा झाल्यानंतरच अंतिम निर्णय होणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. शहरातील महेश भवन येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते. गोरंट्याल यांनी आपल्यावर अन्याय झाला असल्याची भावना देखील व्यक्त केलेली आहे.

जेव्हा जेव्हा काँग्रेस संकटात होती, अखंड काँग्रेसचे विभाजन होऊन राष्ट्रवादी वेगळी व काँग्रेस वेगळी झाली. काँग्रेसचा कोणी वाली नाही अशी परिस्थिती असताना आम्ही काँग्रेस जिवंत ठेवली. यानंतर मोदी लाटेही राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते पडले, अनेकांनी भाजपात प्रवेश केला. तेव्हा देखील आम्ही मोर्चा सांभाळला. ऐतिहासिक असे मताधिक्य मला मिळाले. मी अर्जुन खोतकरांचा पराभव केला आहे. माझी ही तिसरी टर्म आहे. परंतु तरीही आम्हाला डावलला गेलं, असल्याचंही आमदार गोरंट्याल यांनी म्हटलं आहे.