जिल्ह्य़ातील एकूण करोनाबाधितांचा आकडा शुक्रवारी सायंकाळपर्यंत १७४ झाला. यापैकी ८० रुग्ण करोनामुक्त झाले असून उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्य़ातील एकूण नमुन्यांपैकी जवळपास पावणे तीन हजार नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेतून नकारात्मक आला आहे. नकारात्मक नमुन्यांचे प्रमाण जवळपास ९५ टक्के आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी सांगितले.

सध्या जिल्ह्य़ातील संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या व्यक्तींची संख्या चारशेपेक्षा अधिक आहे. करोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कातील आणि सहवासातील ५ हजार ४४२ व्यक्तींची आरोग्य तपासणी आतापर्यंत करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी टाळेबंदीच्या काळात जिल्ह्य़ात जवळपास साडे सातशे गुन्हे नोंदविले असून १४८ व्यक्तींना अटक केली आहे. आठशेपेक्षा अधिक वाहने जप्त केली असून ३३ लाख रुपयांपेक्षा अधिक दंडाची वसुली केली आहे.

गेल्या तीन दिवसांत करोनाबाधितांची संख्या वाढल्याच्या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रवींद्र बिनवडे यांनी शुक्रवारी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. करोनाबाधित रुग्ण आढळलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात (कन्टेन्मेंट झोन) विशेष दक्षता घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केली. ही विशेष दक्षता घेताना संबंधित क्षेत्रातील रहिवाशांची जीवनावश्यक वस्तूंसाठी अडचण होणार नाही, याकडे लक्ष देण्यात यावे. त्याप्रमाणे घरगुती अलगीकरणातील व्यक्ती बाहेर फिरताना आढळली तर कारवाई करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.

जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा, त्याचप्रमाणे अन्य संबंधित वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.