महाराष्ट्र केसरीच्या माध्यमातून अर्जून खोतकर यांना हिंद केसरी खेळायची आहे का ? अर्थात मुंबईहून दिल्लीला जाण्याचा तर तुमचा विचार नाही ना ? असा जोरदार टोला विधान परिषदेतील राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्यमंत्री अर्जून खोतकर यांना लगावला.

पाच दिवसांपासून सुरू असलेल्या ६२ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या रविवारी (दि. २३) झालेल्या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून धनंजय मुंडे बोलत होते. या स्पर्धेत बुलढाण्याचा बाला रफिक शेख महाराष्ट्र केसरी ठरला, त्याने गटविजेत्या अभिजित कटके वर मात केली.

धनंजय मुंडे यांनी भाषणात चांगलीच फटकेबाजी केली. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन अर्जून खोतकर यांनी केल्याचे सांगत, त्यांना महाराष्ट्र केसरीच्या माध्यमातून हिंद केसरी तर खेळायची नाही ना? असा चिमटा काढला. त्यांच्या या कोटीला प्रेक्षकांनी खचून भरलेल्या मैदानानेही दाद दिली.

मुख्यमंत्री देखील या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी येणार होते असे ऐकले होते, ते आले असते तर मातीतली वेगळी कुस्ती येथे पाहायला मिळाली असती. आज कुस्तीतल्या महाराष्ट्र केसरीची निवड झाली आहे. राजकारणातला महाराष्ट्र केसरी निवडायला आणखी एक वर्ष आहे आज मुख्यमंत्री कार्यक्रमाला येणार होते, ते आले असते तर आमची भाषणाची कुस्ती ही रंगली असती, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनाही आव्हान दिले.

आयोजक सेनेचे मंत्री अर्जुन खोतकर आहेत. शिवसेनेसोबत त्यांची नुरा कुस्ती नेहमीच असते. सरकारची खरी कुस्ती आमच्यासोबत २०१९ मध्ये असल्याचेही ते म्हणाले.

आम्ही पक्षभेद विसरून आलो पण आपल्या मित्र पक्षाचे लोक इथे दिसत नाहीत? असा टोला देखील धनंजय मुंडे यांनी यावेळी लगावला. यावेळी माजी मंत्री राजेश टोपे हे ही उपस्थित होते.