जालना जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांना तीन लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आली. जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  गुरुवारी उशीरा ही कारवाई केली. राजेश इतवारे यांच्यासह त्यांना साथ देणाऱ्या एका व्यक्तीलाही यावेळी अटक करण्यात आले. तक्रारदाराने त्यांच्या एजन्सीमार्फत जालना जिल्ह्यातील राष्ट्रीय लोकसंख्या वहीमधील माहिती राष्ट्रीय माहिती केंद्र (एनआयसी) सॉफ्टवेअरमध्ये डाटा एट्रीचे कंत्राट घेतले होते. सदर कामाचे ६० लाख ९५ हजाराचे बिल झाले होते. ते बिल मिळविण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांच्याकडे पाठपुरावा केला असता त्यांनी बजेट नसल्याचे कारण पुढे केले.

यावेळी त्यांनी  ३० लाखाचा धनादेशाच्या बदल्यात  १५ टक्के रक्कमेची मागणी केली होती. तक्रारदाराने पैसे नसल्याचे सांगितल्याने इतवारे यांनी १० लाखांचा धनादेश देतो ते कॅश करा व त्यातुन माझे टक्के प्रमाणे पैसे द्या असे म्हटले.  पैस मिळाल्यानंतर उर्वरित बिल मंजुर करतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांनी ४ लाख ५० हजार रुपयांची मागणी करुन तडजोड करुन ३  लाख रुपये स्विकारण्याची तयारी दाखवली होती. त्यांनी खासगी इसम अतिक अहेमद शेख याला बोलवुन तक्रारदाराला लाचेची रक्कम त्याच्याकडे देण्यास सांगितले होते. १४ एप्रिल रोजी बचत भवन शासकीय निवासस्थान येथे सापळा रचला असता अतिक याने सापळ्याची चाहुल लागल्याने लाचेची रक्कम स्विकारली नाही. त्यानंतर रितसर कायदेशीर प्रक्रिया व परवानगी घेतल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे व अतिक शेख या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.