जलयुक्तच्या कामातून लोकांमध्ये पाण्याच्या बाबतीत जागरूकता निर्माण झाली आहे. गेल्या तीन वर्षांत झालेल्या कामामुळे पाणीटंचाई दूर होत असून, पाण्याचा प्रश्न निकाली लागत असल्याबद्दल समाधान असल्याचे प्रतिपादन जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केले.

जलयुक्त शिवार अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या औरंगाबाद विभागातील जिल्हा, तालुका व गावांना प्रा. शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, त्या प्रसंगी ते बोलत होते. राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार व पुण्यश्लोक होळकर जलमित्र पुरस्कार त्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. या प्रसंगी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, आमदार विनायक पाटील,  सुधाकर भालेराव, प्रताप पाटील चिखलीकर, सुजितसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जि. प. उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, महापौर सुरेश पवार, उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा अर्चना पाटील, नांदेडचे जिल्हाधिकारी सुरेश काकानी, परभणीच्या जि.प. अध्यक्षा उज्ज्वला राठोड, आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, २०१६च्या उन्हाळय़ात लातूर जिल्हय़ात ३७० टँकर पिण्याच्या पाण्यासाठी लावावे लागले होते. जलयुक्त शिवारच्या कामामुळे या वर्षी जिल्हय़ात एकाही टँकरची गरज लागली नाही. जलयुक्त शिवारच्या कामाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. राज्यात ५७० कोटींचा सहभाग मिळाला. त्यात मराठवाडय़ातील सहभाग २७५ कोटींचा होता. जलयुक्तच्या कामाचा लाभ दीर्घकालीन होतो आहे. या कामांना शासन पसे कमी पडू देणार नाही. उपलब्ध असणाऱ्या पाण्याचा वापर शेतकऱ्यांनी जपून करावा यासाठी ठिबक व तुषार सिंचनाचा वापर झाल्यास उत्पादन वाढेल. आगामी काळात पाणी जपून वापरावे लागेल. ज्या गावांना पुरस्कार मिळाला नाही त्या गावांनी अधिक जोमाने काम केले पाहिजे, असे ते म्हणाले.

मराठवाडय़ात १ लाख ४५ हजार ४८७ घनमीटर इतका पाणीसाठा जलयुक्तच्या कामामुळे निर्माण झाला असून त्यातून एवढय़ाच हेक्टर क्षेत्रासाठी दोन वेळा पाणी देता येईल, अशी स्थिती असल्याचे ते म्हणाले. यापूर्वी कंत्राटदारांनी कामात काही चुका केल्यास त्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे अधिकार नव्हते. आता योग्य काम न करणाऱ्या कंत्राटदारांचे नाव काळय़ा यादीत टाकण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले असल्याचे ते म्हणाले. जलसंधारणचा विभागीय प्रथम पुरस्कार उस्मानाबाद जिल्हय़ाने पटकावला. तालुक्यातून मराठवाडय़ात नांदेड जिल्हय़ातील कंधार तालुका तर गावपातळीवर नांदेड जिल्हय़ातील भोकर तालुक्यातील बेंडर गावाला पहिला पुरस्कार मिळाल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले. लातूर येथील पत्रकार अशोक चिंचोले यांना विभागीय स्तरावरील द्वितीय पुरस्कार मिळाला. विभागीय व जिल्हा स्तरावतील पुरस्काराचे वितरण शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.