24 October 2020

News Flash

जांभूळ उत्पादक संकटात

गतवर्षी लांबलेला पाऊस, अळीचा प्रादुर्भाव, करोना संसर्गाचा विळखा

गतवर्षी लांबलेला पाऊस, अळीचा प्रादुर्भाव, करोना संसर्गाचा विळखा

निखिल मेस्त्री, लोकसत्ता

पालघर : गतवर्षी लांबलेला पाऊस, उशिरा आलेले फळ,  फळ काढणीच्या हंगामात पाऊस पडल्याने फळांना लागलेली अळी आणि आता करोनाचा प्रादुर्भाव असे तिहेरी संकटाच्या कचाटय़ात बहाडोलीचे उत्पादक सापडले आहेत. त्यामुळे उत्पादन आणि विक्री करायची कशी या चिंतेने हे उत्पादक हवालदिल झाले आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रात बहाडोलीची टपोरी जांभळे सुप्रसिद्ध आहेत. जांभळांना मे ते जून दरम्यान सर्वत्र चांगली मागणी असते. बहाडोली परिसरात शेकडो शेतकरी अनेक वर्षांपासून जांभूळ व्यवसायावर अवलंबून आहेत. जांभूळ पिकांची योग्य देखभाल केल्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात झाडाला फळधारणा होऊन ती काढण्यायोग्य होतात. त्यानंतर ही फळ काढण्याची प्रक्रिया जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवडय़ापर्यंत सुरू राहते. याच दरम्यान शेतकऱ्यांमार्फत चांगल्या प्रतीचे व दुय्यम प्रतीचे जांभूळ छाटणी करून ती व्यापाऱ्यांना ठोक पद्धतीने विकली जातात. व्यापारी स्वत: येऊन हे जांभूळ खरेदी करीत असत. मात्र यंदा करोनाचे सावट पसरल्यामुळे जांभळाचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प पडला आहे. याउलट यंदा  वातावरणीय बदलामुळे जांभळाचा हंगाम एक महिना पुढे ढकलला गेला. त्यातच फळधारणेच्या वेळेसच पडलेल्या पावसाने जांभळाच्या झाडांवर माश्या येऊ  लागल्याने फळ पोखरणारी कीड फळावर तयार होऊन जांभूळ फळाचे मोठे नुकसान झाले. इतकेच नव्हे तर निसर्ग चक्रीवादळादरम्यान आलेल्या वाऱ्यामुळे जांभळाचा बहर पडल्यानेही काही प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.गतवर्षी चांगल्या प्रतीच्या जांभळांना सुमारे पाचशे रुपये किलो व शेवटी शेवटी दीडशे रुपये किलो असा दर मिळाला होता. मात्र यंदा हाच दर प्रतिकिलो शंभर—दीडशे रुपये इतका मिळाल्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान जांभूळ उत्पादकांना सहन करावे लागत आहे. या भागातून हजारो किलो जांभळाचे उत्पादन घेतले जाते. मात्र तिहेरी संकट ओढवल्याने जांभूळ उत्पादक पूर्णत: हतबल झाला आहे व मोठय़ा आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.एकीकडे कृषी विभाग या जांभळांसाठी जीआय मानांकन मिळवण्याचा प्रयत्न करीत असताना निसर्गाच्या कोपामुळे तसेच अलीकडे आलेल्या करोना संकटामुळे या जांभूळ उत्पादकांना लाखो रुपयांचा मोठा फटका बसला आहे.

गेल्या पाच वर्षांपासून जांभूळ फळाचे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे नुकसान होत असल्याचे लक्षात घेत कृषी विभागामार्फत झाडांवर अत्याधुनिक फवारणी करण्यासाठी प्रवृत्त करून या फळावर प्रक्रिया करून त्यापासून आरोग्यवर्धक उत्पादने घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या गटांना प्रोत्साहित करणार आहोत.

– के. बी. तरकसे, जिल्हा कृषी अधीक्षक

यंदा जांभळाची फळधारणा उशिराने होणे त्यातच फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव  व करोना अशा संकटामुळे जांभळावर अवलंबून असलेल्या आम्हा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने याची दखल घ्यावी.

– अनिल पाटील, जांभूळ उत्पादक शेतकरी

उत्पादन खर्चापेक्षा जांभळाची विक्री निम्म्यावर आली आहे त्यामुळे हा खर्च न निघाल्याने आर्थिक नुकसान झालेले आहे.

प्रकाश किणी, जांभूळ उत्पादक शेतकरी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 3:33 am

Web Title: jamun fruit growers in crisis zws 70
Next Stories
1 अर्नाळ्यात चौथ्यांदा कडक टाळेबंदी, सर्व सीमा बंद
2 जंगल भागात घातक रसायनचा कचरा
3 टाळेबंदीत भाजी बाजाराचे नूतनीकरण
Just Now!
X