शहरात करोनाचा संसर्ग मोठय़ा प्रमाणावर वाढत असून जिल्ह्य़ात २१ दिवसात रूग्णसंख्या दुप्पट झाली आहे. या पार्श्वभूमीवर करोनावर नियंत्रण मिळविण्याचा एक प्रयत्न म्हणून २४ ते २७ जुलै या कालावधीत शहरात कठोर टाळेबंदी करण्याचा निर्णय महापालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

करोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर उपाययोजना करण्याविषयी निर्णय घेण्यासाठी शहरातील व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी, मनपा पदाधिकारी आणि गटनेते, पोलीस अधिकारी यांच्यासमवेत सोमवारी महानगरपालिका सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीस महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजीज शेख, भाजपा महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल, उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, उपजिल्हा पोलीस अधीक्षक भुजबळ, पालिकेतील विरोधी पक्षनेते साबीर, नगरसेवक संजय पाटील, रावसाहेब नांद्रे, किरण अहिरराव, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नितीन बंग आदी उपस्थित होते.

बैठकीत शहरातील करोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता टाळेबंदी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत बहुतांश जणांनी मांडले. महापौर सोनार आणि सभापती बैसाणे यांनीही टाळेबंदीसाठी आग्रह धरला. त्यानुसार शुक्रवारी दुपारी चारपासून ते सोमवारी सकाळी आठ या कालावधीत शहरात जनता संचारबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यादरम्यान फक्त औषधालये आणि घरपोच दूध सेवा वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने, व्यवहार संपूर्णपणे बंद ठेवण्याचे बैठकीत ठरविण्यात आल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली.

दरम्यान, जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत असून रूग्णसंख्येने दोन हजारचा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यात रुग्ण दुप्पट होण्याचा वेग चार पट वाढला आहे. जिल्ह्यात प्रथम एक हजार रुग्ण होण्यास ७९ दिवस लागले. त्यानंतर फक्त २१ दिवसांत रुग्ण दुप्पट झाले. बाधित रुग्ण संख्या वाढत गेल्यामुळे त्याचा परिणाम मृत्यूदर घटण्यावर झाला आहे. सध्याचा मृत्यूदर हा ४.७ टक्के आहे. जिल्ह्यात १० एप्रिल रोजी पहिला सकारात्मक अहवाल आला हेाता. त्याला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. १०० दिवसांत करोना रूग्संख्या दोन हजारापुढे गेली आहे. प्रारंभीचे एक हजार रूग्ण ७९ दिवसांत आढळले. त्यानंतरचे एक हजार रुग्ण केवळ २१ दिवसांत आढळले. २८ जूनला जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या एक हजार ११ होती. त्यानंतर संसर्गाचे प्रमाण झपाटय़ाने वाढल्याने २१ दिवसांत रुग्णांची संख्या चक्क चौपटीने वाढत दोन हजारावर पोहचली. या रूग्णांपैकी ८४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून तब्बल एक हजार ३१५ जण करोनामुक्त झाले आहेत.