|| पंकज भोसले, भगवान मंडलिक

ऑनलाइन विक्रीचा पसारा आखाती देशांपासून अमेरिका, ब्रिटनपर्यंत

आधुनिक जीवनशैलीशी संबंधित उद्योगांचा व्याप झपाटय़ाने विस्तारत असतानाच सनातनी संस्कृतीची ओळख असलेल्या जानवे किंवा यज्ञोपवीत निर्मितीच्या उद्योगाचे सूत्र आजही अखंड टिकून आहे. देशातच नव्हे, तर ऑनलाइन विक्रीद्वारे या जानव्याने आखाती देशांपासून ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, अमेरिकेतही आपले अस्तित्व निर्माण केले आहे. देशभरात लक्षावधी रुपयांची उलाढाल असलेल्या या उद्योगाने रोजगारनिर्मितीला चालना दिली आहे.

अर्थकारणाच्या जागतिकीकरणोत्तर काळात धर्म आणि धर्मासंबंधी प्रथा-परंपरा विसरण्याचा आणि धार्मिक विधी आटोपशीर करण्याकडे लोकांचा कल वाढला असला, तरी काही गोष्टींना जराही धक्का लागलेला नाही. जानवे हे त्यातलेच एक! पूजा-विधी साहित्य मिळणाऱ्या दुकानांत सहा-सात रुपयांना मिळणाऱ्या या दोऱ्याची मागणी प्रचंड जोमात आहे. कर्नाटक, मडगाव, कारवार या भागांमधून महाराष्ट्र आणि दक्षिणेतील सर्व राज्यांत जानवे पुरविले जाते. डोंबिवलीमध्ये जानवे बनविण्याचा मुंबईतील सर्वात मोठा उद्योग असून पुणे-नाशिक या पट्टय़ांमध्ये शेकडो वर्षे हा व्यवसाय पिढीगत टिकवून ठेवणारे लोक आहेत.

दोऱ्याचे महत्त्व   

ब्राह्मण, सोनार आणि इतर अनेक हिंदू समुदायांत धार्मिक विधींसाठी जानवे  महत्त्वाचे असते. ब्राह्मणांमध्ये त्याचा सर्वाधिक वापर होतो. विविध धार्मिक कार्यासोबत लग्न, मुंज, श्रावण महिन्यात श्रावणीच्या दिवशी जानवे बदलले जाते. धार्मिक उत्सव, श्रावणी, नारळी पौर्णिमा, चातुर्मास, नागपंचमी, गणेशोत्सव आदी सणांच्या काळात जानव्यांची मागणी अधिक असते. सूरगाठ, निरगाठ आणि ब्रह्मगाठ अशा तीन सूत्रांतील जानवी वापरण्याची पद्धत आहे. जानवे हे विशिष्ट मंत्र उच्चारून बनविले जाते.

उलाढाल अशी..

डोंबिवलीतील श्रीकांत गणेश साने (वय ७८) हे जानवी तयार करण्याचा वडिलोपार्जित व्यवसाय पुढे चालवीत आहेत. दरमहा ७५ हजार जानवी त्यांच्याकडून राज्य आणि राज्याबाहेर वितरित होतात. तरी मुंबई आणि राज्यातील दुकानांतील केवळ २० टक्के जानवीच मी पुरवू शकतो, हे ते प्रांजळपणे सांगतात. त्यांचे उद्योगभांडवल महिना पंचवीस हजारांचे आहे. दहा जणांच्या कुटुंबाला त्यातून रोजगार मिळतो. आमच्या जानव्यांची गुणवत्ता आहे, म्हणून  मागणी प्रचंड आहे. हा खूप  फायद्यातला व्यवसाय नाही. अन् आम्ही त्याकडे व्यवसाय म्हणून पाहत नाही. वडिलोपार्जित व्यवसाय म्हणून हा पुढे चालला आहे. इतर व्यवसायांसारखी यात तीव्र स्पर्धा नाही किंवा चढाओढ नाही.

नाशिकमधील काळाराम मंदिरात पूजेचे काम पाहणाऱ्या हेमंत गर्गे आपल्या कुटुंबासह जानवी बनवितात. शेकडो वर्षांपासून त्यांच्या घरातून नाशिकच्या बाजारपेठेतील सत्तर टक्के जानवी जातात. त्यांच्या वडिलांनी चरख्यापासून सूत कातून जानवी बनविण्यास सुरुवात केली होती. आठवडय़ाला हजारो जानवी तयार करणाऱ्या गर्गे यांच्याकडे जानव्यांचा कच्चा माल मुंबईतील मशिदबंदर येथून येतो. पुण्यामध्येही शेकडो वर्षांपासून  जानवी बनविणारी घराणी आहेत. अन् प्रत्येकाचे त्याबाबतचे ठरलेले सूत्र आणि शास्त्र निश्चित आहे. मुंबई- ठाण्यातील बहुतांश जानवी कर्नाटक आणि मडगाव भागांतून येतात, अशी माहिती ठाण्यातील विद्वंस ब्रदर्सच्या प्रतीक विद्वंस यांनी दिली.

३२ इंच (९६ अंगुष्ठे), मुंज झालेल्या बटुंसाठी २६ इंच, दक्षिण भारतात ३४ आणि ३६ इंचाच्या जानव्यांना अधिक मागणी असते. ३२ इंचाचे जानवे सर्वसामान्य असते. वैदिक काळापासून गुरूगृही शिकण्यास जाताना विद्यार्थ्यांला जानवे परिधान करावे लागे. जानवे घालताना ब्रह्मचर्य पाळण्याला महत्त्व आहे. नैसर्गिक विधीच्यावेळी कानावर जानवे बांधण्यामागे शरीरविज्ञान असल्याचाही दावा करण्यात येतो.

साने यांचा ब्रॅण्ड!

अगदी तीस वर्षांपूर्वीपर्यंत संपूर्ण राज्यभरात कर्नाटकमधून जानवी आयात होत असत. तेथील भट कुटुंबाची जानवी संपूर्ण दक्षिण प्रांतात लोकप्रिय होती. राज्यभरात स्थानिक पातळीवर फार थोडय़ा प्रमाणावर जानवी बनविली जात. मात्र भट कुटुंबाच्या पुढील पिढीने हा व्यवसाय वाढविला नाही. परिणामी राज्यभरातील जानव्यांची मागणी वाढली, अशी माहिती डोंबिवलीतील श्रीकांत साने यांनी दिली. साने यांनी १९७५ ते १९९५ या काळात राज्यभरांत फिरून बहुतांश तालुक्याच्या दुकानांमध्ये आपल्या जानव्यांचा ब्रॅण्ड पक्का केला. आता मागणीइतका जानव्यांचा पुरवठा आम्ही करू शकत नाही, असे ते सांगतात. कारागिर आणि इतर व्यावसायिक अडचणी याही क्षेत्रात आहेत. पण त्याला टाळून व्यवसाय चालला आहे, याचा त्यांना आनंद आहे.

सोन्याचे जानवे..

मुंजीच्या हंगामात गेल्या काही वर्षांपासून सोन्याचे जानवे बनविण्याकडे कल वाढला असल्याचे हेमंत गर्गे यांनी सांगितले. सोनाराकडून सोन्याच्या काडय़ा बनवून घेतल्या जातात. त्यांची ब्रह्मगाठ जानवी बनविणाऱ्यांकडूनच बांधली जाते. नाशिक, पुणे आणि मुंबईत सोन्याची जानवी बनविण्याचे प्रस्थ वाढत असून त्याचा खर्च १० हजारांपासून पुढे ती बनवून घेणाऱ्याच्या खर्चतयारीवर आणि हौसेवर अवलंबून असल्याचे विक्रेते सांगतात.

ऑनलाइन बाजार..

अ‍ॅमेझॉनपासून कित्येक ऑनलाइन दुकानांवर जानव्यांची विक्री होते. ब्रिटनमध्ये पाच पौंडाला जानवे विकले जाते. अमेरिकेमधील भारतीय दुकानदार ऑनलाइन बाजारातून मोठय़ा प्रमाणावर जानवी विकत घेतात. ब्रिटनमध्येही कर्नाटक आणि भारताच्या दक्षिण भागांतून जानवी आयात होत असल्याचे तेथील विक्रेत्यांनी सांगितले.

मागणी कायमच..

कापसाचा शुद्ध सुती धागा वापरून नऊ फेऱ्यांचे ब्रह्मगाठ सूत्राचे शास्त्रोक्त जानवे बनविले जाते. आता अलिकडे पूर्वीसारखा दोरा, कापूस मिळत नसल्याने त्याच्या गुणवत्तेत बदल झाला असला, तरी प्रामाणिकपणे जानवे बनविले जात असून त्याला मागणी कायमच असल्याचे ठाण्यातील घंटाळी देवी मंदिराचे पुजारी श्रीपाद जोशी यांनी सांगितले.