|| नीरज राऊत

डहाणूतील आदिवासी कलाकाराचे जपानी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण:- आदिवासी समाजाची ओळख असलेल्या वारली चित्रकलेला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळाली असून डहाणूत राहणाऱ्या राजेश मोर या कलाकाराची वारली चित्रे जपानच्या शाळेतील भिंतीवर साकारली आहेत. याची ख्याती समाजमाध्यमांवर पसरल्यानंतर राजेश मोर यांना वारली चित्रकलेसाठी मोठी मागणी येऊ  लागली आहे.

राजेश मोर यांचे वारली चित्रकलेतील नैपुण्य पाहिल्याने जपानच्या ‘वॉल आर्ट प्रोजेक्ट’ या संस्थेकडून त्यांना इन्होवाशिरो येथील शाळेत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आमंत्रित केले होते. विशेष म्हणजे या शाळेतील १४ फूट रुंद व ८५ फूट उंचीची भिंत राजेश यांच्या वारली चित्रकलेने साकारण्यात आली असून या भिंतीवर जपानचे पूर्वीचे आणि सध्याचे जीवनमान कथास्वरूपात साकारण्यात आले आहे. राजेश यांच्या वारली चित्रकलेची ख्याती सर्वदूर पसरली असून फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका येथे त्यांच्या चित्रांना मागणी आहे.

डहाणूतील गंजाडजवळील नवनाथ (दौडनपाडा) गावात राहणाऱ्या राजेश यांना लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. कोणतेही चित्र काढायला घेतल्यावर राजेश यांच्या हातून उत्तम चित्रकला साकारत होती. त्यांच्या चित्रकलेतील आवडीमुळे त्यांनी सुरुवातीच्या काळात निवडणुका,जाहिरातींसाठी लागणारे फलक तयार करण्याचे काम केले.  जपानस्थित वॉल आर्ट प्रोजेक्ट या संस्थेच्या वतीने २०१० पासून ग्रामीण भागातील शाळेत ‘भिंत कला प्रदर्शन’ भरवण्यात येते. २०१३ मध्ये या संस्थेच्या अकिको ओकुनी आणि हमायु ओकुनी यांनी डहाणूतील गावात भेट दिल्यावर त्यांना राजेश यांनी काढलेली वारली चित्रे आवडली. राजेश यांचे वारली कलेतील प्रावीण्य पाहिल्यावर या संस्थेने त्यांना जपानमधील शाळेत विद्यार्थ्यांना वारली चित्रकला शिकविण्यासाठी ऑक्टोबर २०१८ मध्ये आमंत्रित केले होते. जपानमध्ये राजेश यांनी एक महिना इनोव्हाशिरो शहरातील शाळेत पाचवी ते दहावी इयत्तेतील विद्यार्थ्यांना वारली चित्रकला शिकवली. केवळ हाताच्या अंगठय़ापासूनही उत्तम चित्रकला साकारण्यात येऊ  शकते याविषयी जपानी विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण केला. या आदिवासी कलाकारांच्या चित्रांना अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, पॅरिस अशा जगभरातून मागणी येत असून पूर्वीपेक्षा या आदिवासी कलाकारांची आर्थिक स्थिती सुधारली आहे, असे द इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेजच्या संयोजक फिरोझा ताप्ती यांनी सांगितले.  आदिवासी कलाकारांकडून चित्रकलेचे बारकावे शिकण्यासारखे आहेत. त्यांचे साधे राहणीमान आकर्षित करणारे आहे. राजेश यांच्या कलेचा जास्तीत जास्त प्रसार करण्यासाठी प्रय करणार आहे असे जपानच्या वॉल आर्ट प्रोजेक्टचे हमायु यांनी सांगितले.

शाळेच्या भिंतीवर ‘वारली चित्रकला’

या शाळेतील १८ फूट रुंद व ८५ फुटांची एक भिंत राजेश यांनी वारली चित्रकलेने रंगवली आहे. यात जपान आणि भारत यांच्या ग्रामीण जीवनशैलीत साधम्र्य असल्याचे चित्र साकारण्यात आले आहे. तसेच जपानमधील पूर्वीची जीवनशैली आणि आधुनिक जीवनशैली याचे वर्णन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील आदिवासींप्रमाणेच जपानमध्ये जंगलात पिकणाऱ्या खाद्यपदार्थावर लोक अवलंबून आहेत, असे दर्शवणारे चित्र साकारण्यात आले आहे.