तरुणीची फसवणूक

नागपूर : जर्मन तरुणाशी विवाह करण्याच्या आमिषाला बळी पडल्याने एका तरुणीने उधार सहा लाख रुपये घेतले व ऑनलाईन प्रेम झालेल्या तरुणाला दिले. मात्र यासाठी उधार देणाऱ्यांनी तिच्या घरावरच ताबा मिळवला असून आता तरुणीने पोलिसांत तक्रार दिली.

याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मायकल फ्रॅन्क रा. जर्मनी, शबनम शेख रा. सोनेगाव आणि प्रीती रायपुरे सोमकुंवर रा. सुभाषनगर अशी आरोपींची नाव आहेत.

रुचिका भाऊराव झोडापे (२७) रा. काशीनगर, शताब्दी चौक असे फिर्यादीचे नाव आहे. तिने माहिती तंत्रज्ञान विषयातून अभियांत्रिकी पदवी संपादन केली असून सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करते. दरम्यान, तिने विवाहासाठी एका विवाह संस्थेच्या संकेतस्थळावर नोंदणी केली होती. दरम्यान, तिची फेसबुकवरून मायकल नावाच्या बनावट तरुणाशी ओळख झाली. यावेळी त्यांच्यात ऑनलाईन संवाद वाढला. त्याने तिला विवाह करण्याचे आश्वासन दिले. तिला भेटण्याकरिता नागपुरात येणार असल्याचेही बोलला. दरम्यान त्याने तिला एक मौल्यवान भेट पाठवली असून ती विमानतळावर अडकली असल्याचे सांगितले. ती मौल्यवान भेटवस्तू सोडवण्यासाठी पैशाची आवश्यकता होती. तिने त्याने सांगितल्याप्रमाणे पैशाची तजवीज केली. तिच्याकडे पैसे नव्हते, तर तिने शबनम व प्रीती यांच्याकडून सहा लाख रुपये मार्च २०१९ मध्ये १५ दिवसांकरिता व्याजाने घेतले. अनेक दिवस उलटूनही ती पैसे परत करीत नव्हती. दरम्यान, तिचे एक घर असून त्या ठिकाणी कुणीच राहात नसल्याचे शबनम व प्रीती यांना समजले. त्यांनी तिच्या रिकाम्या घरात घुसून त्याला स्वत:चे कुलूप लावून घरावर ताबा मिळवला. याप्रकरणी रुचिकाने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.