विजय राऊत

रोजगाराअभावी गरिबी, कुपोषण यांसह विविध समस्यांनी ग्रस्त असलेल्या जव्हार-मोखाडय़ातील आदिवासी शेतकऱ्यांना मोगऱ्याच्या रूपाने ‘सुंगधी’ रोजगार मिळाला आहे. पालघर जिल्ह्यामध्ये ग्रामीण विकासाचे काम करणाऱ्या ‘बायस’ या शेतकरी संस्थेच्या माध्यमातून या तालुक्यांतील २५०० शेतकऱ्यांनी मोगरा शेती फुलवली आहे. तालुक्यांतील अनेक  हेक्टरवर मोगऱ्याची लागवड करण्यात आली असून त्यामुळे शेतकऱ्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे.

बायफ ही खासगी शेतकरी संस्था असून पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करते. या संस्थेच्या माध्यमातून जव्हार व मोखाडा तालुक्यामधील शेतकऱ्यांना संघटीत करून मोगरा शेती करण्यात आली. मोगरा कळीचे व्यवस्थापन करून ‘मोगरा वृंदावन पुष्प फार्मर प्रोडय़ुसर कंपनी लि.’ या नावाची कंपनी स्थापना करण्यात आली. या कंपनीद्वारे शेतकरी उत्पादित करत असलेली मोगरा कळी रोज सकाळी संकलित करून दादर येथे विक्रीसाठी पाठवली जाते. त्याद्वारे शेतकऱ्यांना वाहतूक खर्च वजा करता चांगला दर मिळतो. सध्या या कंपनीचे २५० सभासद आहेत.

जव्हार आणि मोखाडा तालुक्यांतील उंबरवांगण, वाळवंडा, चौक, शिरोशी, कळमविहारा, डेंगाचीमेट, गारदवाडी, वनवासी, जामसार, खरोंडा, पिंपशेत, हेदीचापाडा या गावांत मोगऱ्याचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले जाते. शेतकरी दररोज जवळपास ९० किलोहून मोगरा कळी काढत आहे. मोगरा कळी काढल्यानंतर ती एकत्र जमा करून विक्रीसाठी पाठवण्यात येते. मोगऱ्याच्या शेतीतून शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध झाली असून रोजगार मिळत आहे. ज्या गावात मोगरा शेती केली जाते, तिथे शेतकऱ्यांचे स्थलांतर कमी झाले आहे.

बायफ या संस्थेने जव्हार आणि  मोखाडा या तालुक्यात २००७मध्ये काम करण्यास सुरुवात केली. आधी  आंबा आणि काजू या पिकांची रोपे देऊन शेतकऱ्यांना रोजगार मिळवण्यासाठीच्या या पिकांकडे वळवले. त्यानंतर आता मोगरा पिकाची लागवड करून आदिवासी शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

शेतकऱ्यांना ‘कुलिंग व्हॅन’ची गरज

मोगऱ्याची लागवड करणारे शेतकरी मोगरा कळी रोजच खुडून बाजारपेठेत पाठवतात. या शेतकऱ्यांना मोगरा कळी बाजारात पाठवण्यासाठी कुलिंग व्हॅनची अधिक गरज आहे. ही कुलिंग व्हॅन असेल तर उशिरानेही मोगरा पाठवता येईल, असेही शेतकऱ्यांनी सांगितले.

बायफ या संस्थेमुळे आम्हाला मोठा आधार मिळाला आम्हाला रोजगारासाठी स्थलांतर करावे लागत होते. परंतु या संस्थेने आम्हाला मोगऱ्याचे रोप दिल्यामुळे आम्ही चांगले उत्पन्न घेऊ  शकलो

– महेश धूम, शेतकरी

जव्हार-मोखाडा या तालुक्यांमध्ये बायफ संस्थेच्या माध्यमातून एक शाश्वत उत्पन्नाचे साधन म्हणून आंबा व काजू यांची लागवड करण्यात आली. त्याचबरोबर आंतरपीक म्हणून मोगऱ्याचे उत्पन्न करण्यास सुरुवात केली. उपलब्ध असलेलया साधनसंपत्तीचा योग्य वापर करून शेतकऱ्यांना गावस्तरावर एक नियमित उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे.

– सुनील कामड, मुख्य कार्यकारी अधिकारी, बायफ