जिल्ह्य़ातील बाल्यावस्थेत असलेल्या मात्र राजकीय परिपक्व मानल्या गेलेल्या जत नगरपालिकेच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्ष निवडीत काँग्रेसच्या शुभांगी बन्नेनवर यांना निसटता विजय मिळाला असला तरी भाजपचे आमदार विलासराव जगताप यांना आपल्या कारभारात सुधारणा करण्याचा संदेश देणारा आहे.

जत विधानसभा मतदार संघामध्ये जत हे तालुक्याचे ठिकाण असले तरी आजही विकासापासून कोसो दूर असलेले खेडेगाववजा शहर म्हणावे लागेल. पाच वर्षांपूर्वी या ठिकाणी नगरपालिका स्थापन झाली असली तरी याचा नेमका काय लाभ झाला याचा शोध दुर्बणिीने घ्यावा लागेल अशी आजही स्थिती आहे. पिण्याचे सुयोग्य पाणी नाही, गटारे नाहीत, स्वच्छता म्हणजे काय असा प्रश्न पडावा अशी स्थिती, त्यातच मुख्य बसस्थानक परिसरात वाहनांची वर्दळ नित्याचीच.

नव्याने नगरपालिकेची स्थापना झाल्यावर काही तरी बदल होईल अशी अपेक्षा होती. मात्र, जी सांगली महापालिकेची स्थिती आहे त्याहून अधिक बिकट अवस्था शहराची झाली आहे. कन्नडबहुल लोकसंख्या, विजापूर, चडचणशी नित्याचा संपर्क असणाऱ्या या शहराचा विकास जाणीवपूर्वक करावा अशी ना स्थानिक नेत्यांची इच्छा ना जिल्हा स्तरावरील नेत्यांची भावना. यामुळेच राज्यात सर्वाधिक विस्ताराचा हा तालुका आजही केव्हा पहाट होते याची प्रतीक्षा करीत आहे.

अशा या शहरातील राजकीय नेते मात्र जनतेच्या मतावर गोळाबेरीज करीत कधी मार्केट कमिटी, कधी जिल्हा बँक, कधी आमदारकी तर कधी जिल्हा परिषदेची सत्तास्थाने उपभोगत राहिले. राजकीय तडजोडीचा फार मोठा फटका या तालुक्यातील जनतेला बसला आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी दाखवत आजपर्यंतचे राजकारण घडत आणि घडवत गेले. याचे परिणाम सीमावर्ती ४६ गावे आज कर्नाटकात जाण्याच्या मनस्थितीत आहेत. तसे निवेदनही त्यांनी दिले आहे.

मात्र, यापासून कोणताही धडा निवडणुकीच्या पातळीवर घेतला गेला नाही. याची खंत आजही कोणाला वाटत नाही हे येथील जनतेचे दुर्दैव म्हणावे लागेल. कारण याबाबतची जागरूकताच होणार नाही याची दक्षता आजपर्यंत नेतृत्व लाभलेल्या लोकांनी घेतली. जे काही नेते सांगलीत येऊन मोठे झाले ते ठेकेदारीच्या चंदीवर गुजराण करीत रोज एक पद पादाक्रांत करीत राहिले.

नगरपालिकेसाठी मतदार संख्याही अवघी २५ हजार. महापालिका निवडणुकीत एका प्रभागाची मतदार संख्या असलेली ही नगरपालिका. तरीसुद्धा भाजपाने नगराध्यक्ष निवड प्रतिष्ठेची केली होती. शहरात आणि तालुक्यात प्रथितयश वैद्यकीय व्यावसायिक असलेल्या डॉ. आरळी यांनी यानिमित्ताने आपली राजकीय ताकद अजमावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना उमेदवारी ही केवळ आमदार जगताप यांच्या माध्यमातून मिळालेली नव्हती. भाजपाच्या निष्ठावान गटाकडून आलेल्या दबावातून मिळालेली उमेदवारी त्यांना रेटता आली नाही. त्यांचा काँग्रेसकडून अवघ्या १७८ मतांनी पराभव झाला असल्याने भाजपाची ताकद वाढली असल्याचा काढला जात असलेला निष्कर्ष मात्र अनाठायी आहे. कारण काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादीही रिंगणात होती. यामुळे मतांचा अत्यल्प फरक असला तरी विरोधातील मतांची बेरीजही भाजपाला विशेषत आ. जगताप यांना आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे.

नगरपालिकेत भाजपाला सर्वाधिक म्हणजे सात जागा मिळाल्या असल्या तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना प्रत्येकी सहा जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसचे विक्रम सावंत यांनी मरणासन्न झालेल्या काँग्रेसला ऊर्जतिावस्था प्राप्त करून दिली असल्याने हा धोका विधानसभा निवडणुकीसाठी समोर दिसत आहे. आमदार पुत्र मनोज जगताप यांचा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवापासून कोणताच सल्ला आमदारांनी घेतला नाही याचीच ही परिणिती आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

भाजपाच्या प्रचारासाठी पालकमंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. मात्र, मतदारांना विश्वास देण्यास ही मंडळी कमी पडली हे मान्यच करावे लागेल. केवळ राष्ट्रवादी आणि काँग्रेसने नगरपालिकेच्या कारभाराचे वाटोळे केले एवढय़ा आरोपावर निवडणूक जिंकता येत नाही, तर विकासाचे धोरण देण्यास जबाबदार भाजपाचे नेतृत्व उणे पडले हेच यावरून स्पष्ट होते.

जतला केवळ म्हैसाळ योजनाच विकासाचे महाद्वार आहे असा गवगवा केला जात आहे. मात्र, येथील अनेक बाबी बाजारपेठेशी निगडित असतानाही त्याचा गांभीर्याने विचार मात्र केला जात नाही. जतची लोकर, माडग्याळी मेंढी, डािळब याचबरोबर बिळुरच्या रानातील नागवेली अशा गोष्टी शेजारच्या कवठ्यातील लोकांना ज्ञात नाहीत, मग जिल्ह्य़ाची आणि राज्याची गोष्ट तर दूरच.

  • सध्या जत नगरपालिकेत भाजपा सर्वाधिक सदस्य असलेला राजकीय पक्ष असला तरी कारभार करीत असताना एकमेकांचे सहकार्य हे घ्यावे लागणार आहे. थेट निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली असली तरी भाजपाला विरोध म्हणून कॉंग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येतील याबाबतही साशंकता आहे.
  • कारण राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे आणि आमदार जगताप हे जुने सहकारी आहेत. या दोघांचा राजकीय शत्रू म्हणून काँग्रेसचे विक्रम सावंत यांच्याकडे बोट दाखविले जाते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांच्याशी त्यांचे प-पाहुण्याचे नाते आहे. हीच गोष्ट आजपर्यंत जगताप-शिंदे या जोडगोळीला खटकत आली. यातूनच हा विरोध तीव्र स्वरूपात राजकीय क्षेत्रातही बळावत गेला. याचा परिणाम शहराच्या विकासावर झाला आहे. या चुका सुधारल्या तर ठीक; अन्यथा विधानसभा निवडणुकीवेळी या सर्व परिणामांची उत्तरे जनता निश्चितपणे मागणार आहे, ती देण्याची तयारीही सर्वानाच ठेवावी लागणार आहे.

(  विलासराव जगताप  ))