15 August 2020

News Flash

रा.स्व संघाला भूमिका जाहीर करण्याच्या चर्चेसाठी आव्हान

जाती अंत करण्यासाठी, जातीय व्यवस्थेला मूठमाती देऊन एकसंघ समाज निर्माण करण्यासाठी, केंद्र व राज्य सरकारची मार्गदर्शक संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रथम भूमिका जाहीर करावी

जाती अंत करण्यासाठी, जातीय व्यवस्थेला मूठमाती देऊन एकसंघ समाज निर्माण करण्यासाठी, केंद्र व राज्य सरकारची मार्गदर्शक संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रथम भूमिका जाहीर करावी तसे केल्याशिवाय त्यांची राष्ट्र उभारणीची त्यांची भूमिका खरी की खोटी हे स्पष्ट होणार नाही, असे आवाहन करीत, त्यासाठी रा.स्व संघाला राज्यव्यापी जातीअंत परिषदेने कोणत्याही व्यासपीठावर जाहीर चर्चा करण्याचे आव्हान देण्यात आले.
राज्यातील पहिली राज्यव्यापी जातीअंत परिषद आज, रविवारी नगरमध्ये रेसिडेन्सिअल कॉलेजच्या मैदानावर भारिप बहुजन महासंघासहित विविध डावे पक्ष व संघटनांनी अॅड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती, त्यावेळी हे आवाहन करण्यात आले. यावेळी विविध वक्तयांनी आरएसएसच्या जातीय व धार्मिकवादावर जोरदार हल्ला चढवला. परिषदेत विविध स्वरुपाचे १० ठराव करण्यात आले. ‘जातीअंतातून राष्ट्रवादाकडे’ या संकल्पनेवर आधारित ही परिषद आयोजित करण्यात आली होती.
कॉ. भालचंद्र कानगो, डॉ. भरत पाटणकर, स्मिता पानसरे, भीमराव बनसोड, किशोर जाधव, प्रतिमा परदेशी, डॉ. गेल ऑम्व्हेट, किशोर ढमाले आदींची यावेळी भाषणे झाली. भारिप महुजन महासंघ, लाल निशाण लेनिनवादी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, श्रमित मुक्ती दल, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, सेक्युलर मुव्हमेंट, मा्र्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, लालनिशाण पक्ष (नवे पर्व) तसेच फुले-आंबेडकरवादी, डाव्या विचारांच्या संघटना परिषदेत सहभागी झाल्या होत्या.
संत परंपरेला अनुसरुन स्त्री-पुरुष समानतेचा समान नागरी कायदा करा व मुस्लिम समुदाय मान्यता देत नाही तोपर्यंत समान नागरी कायदा त्यांना लागू करु नये, देहू येथे वारकरी परंपरेला अनुसरुन धार्मिक शिक्षण देणारी संस्था किंवा विद्यापीठ सुरू करावे व त्यामार्फत पुजारी किंवा हभप होण्यासाठी, ठरवण्यासाठी कायदा करावा व कायद्यामार्फतच पुजारी होण्याचा अधिकार हिंदू धर्मातील सर्व समाजाला मिळावा, या संस्थेतून उत्तीर्ण झालेल्याचीच मंदिरावर पुजारी म्हणुन नियुक्ती करावी, ओबीसी आरक्षण काढून घेण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कारस्थान हाणून पाडावे, सर्व धर्मियांच्या धार्मिक अधिकारांचे संहितीकरण करावे, इयत्ता १० व १२ वीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ७० टक्के गुण मिळतील त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी, आंतरजातीय विवाह करणाऱ्यांच्या अपत्यांच्या सरकारी फॉर्ममध्ये जातीचा उल्लेख नसावा, सार्वभौमत्व व स्वावलंबनासाठी आवश्यक आर्थिक क्षेत्राची मालकी केंद्र व राज्य सरकारकडे असावी, कोल्हापुरमधील तथाकथित ऑनर किलिंग घटनेचा निषेध, दिल्लीत विद्यार्थ्यांच्या मोर्चावर, नागपूरला ग्रामपंचायत संगणक परिचालक ऑपरेटरवर पोलीसांनी केलेल्या निघृण लाठी हल्ल्याचा निषेध, डॉ. दाभोळकर, कॉ. पानसरे व डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येच्या तपासाबाबत सरकारच्या इच्छाशक्तीच्या अभावी गुन्हेगार मोकाट सुटले आहेत, तपासी अधिकाऱ्यांनाही ते धमक्या देत आहेत, हा खेळ सामान्यांच्या जीवावर उठणारी परिस्थिती असल्याने ती बदलण्यासाठी जनतेनेच पुढाकार घ्यावा, असे ठराव करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2015 2:50 am

Web Title: jatiant conference in nagar
टॅग Rss
Next Stories
1 पर्यटनाच्या बळकटीसाठी महोत्सव आवश्यक
2 जिल्हा परिषद कर्मचारी भरतीची चौकशी होणार
3 युवक काँग्रेसचा कार्यकर्ता स्थानबद्ध
Just Now!
X