जगप्रसिध्द शिराळ्यात होणारी जिवंत नागाची पूजा करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात कायद्यात बदल केला जाईल आणि पुढील वर्षी नागपंचमी साजरी करण्यासाठी मी स्वत: उपस्थित राहणार असल्याची ग्वाही केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी दिली. नागपंचमीसोबतच बलगाडी शर्यती सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मंत्र्यांच्या आश्वासनानंतर गेले तीन दिवस सुरू असलेले शिराळा बंद आंदोलन मागे घेण्यात आले.

सांगली जिल्ह्णाात नागपंचमीला जिवंत नागाच्या पूजनाची प्रथा आहे. मात्र गेल्या वर्षांपासून न्यायालयाच्या आदेशाने जिवंत नागाची पूजा बंद करण्यात आली. या वेळी जिवंत नागपूजा करण्यास मान्यता मिळावी यासाठी नागमंडळाचे कार्यकत्रे व सर्वच राजकीय पक्षांनी गेल्या तीन दिवसापासून आंदोलन सुरू केले होते.
भाजपाचे आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, सरपंच गजानन सोनटक्के, काँग्रेसचे सत्यजित देशमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत आदींसह सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज पुण्यात विश्रामगृहावर जावडेकर यांची भेट घेऊन निवेदन दिल्यानंतर हे आश्वासन त्यांनी दिले.
शिष्टमंडळाशी बोलताना जावडेकर म्हणाले की, शिराळ्याची नागपंचमी आणि बलगाडा शर्यती सुरू करण्याबाबत स्थापन करण्यात आलेल्या सुब्रमण्यम समितीचा अहवाल येत्या दोन महिन्यात सरकारला प्राप्त होणार आहे. या परंपरांचे जतन होण्यासाठी कायद्यात बदल करण्याची शासनाची तयारी असून हिवाळी अधिवेशनात हे बदल करण्यात येतील. अगोदरच्या शासनाने या प्रथांबाबत चुकीची माहिती न्यायालयात सादर केल्यामुळे ही बंदी आली असून यामध्ये आम्ही बदल करणार आहोत. यंदा वेळ कमी असल्यामुळे या वेळी पारंपरिक नागपूजा करता येणार नाही. मात्र पुढील वर्षी शिराळ्याची जगप्रसिध्द नागपंचमी पूर्वीच्याच उत्साहात साजरी करण्यासाठी मी स्वत: हजर राहणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.
जावडेकरांच्या घरात १०-१२ नाग सोडा- राजू शेट्टी<br />दरम्यान, शिराळ्यातील नागपूजा करण्यास परवानगी मिळावी यासाठी पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घरात दहा बारा जिवंत नाग सोडा, असा सल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिला असल्याचे ध्वनिमुद्रण काल कार्यकर्त्यांना ऐकविल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. संसदेतील प्रतिनिधी म्हणून शिराळकरांचा प्रश्न सोडविण्यासाठी आवाहन करीत असताना त्यांनी हा सल्ला दिल्याने शिराळावासीयांत असंतोष व्यक्त करण्यात आला. मात्र, आपण कांदा उत्पादकांच्या आंदोलनात व्यग्र असल्याने आंदोलनात सहभागी होत नसल्याचा खुलासा खासदार शेट्टी यांनी केला.