जवखेडे हत्याकांडाचा पोलीस तपास योग्य दिशेने सुरू असला तरी स्थानिक पोलिसांना तपासासाठी यापेक्षा अधिक वेळ देता येणार नाही, घटनेला सव्वा महिना लोटला आहे. तातडीने तपास न लागल्यास या गुन्हय़ाचा तपास सीबीआयकडे सोपवला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना आज (रविवारी) स्पष्ट केले.
जवखेडे खालसा (ता. पाथर्डी) येथील तिहेरी दलित हत्याकांडाच्या घटनेला आज चाळीस दिवस पूर्ण झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज अचानकपणे जवखेडे येथे अत्याचारग्रस्त जाधव कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.
मुख्यमंत्री म्हणाले, घटना गंभीर व अस्वस्थ करणारी आहे. तपास करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांशी आपण चर्चा केली आहे. त्यांच्याकडून दैनंदिन माहितीही घेत होतो. या हत्याकांडाच्या तपासाविषयी पीडित जाधव कुटुंबाचे काही आक्षेप व तक्रारीही आहेत, त्याची आपण जातीने शहानिशा करू.
जाधव कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांशी बोलताना सांगितले, की आमच्याकडे पैसाआडका काही नाही, तरीही तीन जणांची हत्या करण्यात आली. आरोपी माहीतगार आहेत. त्यांची नावे आम्ही पोलिसांना दिली आहेत, मात्र आमच्याच नातेवाइकांची पोलीस नार्को चाचणी करत आहेत. गुन्हा कबूल करा, तुम्हाला बंगला बांधून देऊ, असा दबाव पोलीस अधिकारी आणत आहेत. आमच्या कुटुंबातील मुलीला ३ हजार रुपये देऊन गुन्हा मान्य कर अशी दटावणी एका महिला पोलीस अधिकाऱ्याने केली, त्याची आम्ही पोलिसांकडे लेखी तक्रार केली, परंतु त्याची दखल घेतली नाही.