यवतमाळमध्ये खरीप हंगामादरम्यान जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांकडून विम्याची रक्कम घेत त्यांना मोबदला न देणाऱ्या येथील ईफको टोकीयो कंपनीच्या कार्यालयापुढे खासदार भावना गवळी यांनी आज शिवसेनेतील आपल्या समर्थकांसह ‘जवाब दो’ आंदोलन केलं. भावना गवळी यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे शिष्टमंडळ व्यवस्थापकांशी चर्चा करत असताना शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी व्यवस्थापकांच्या अंगावर सोयाबीन टाकून त्यांची कॉलर ओढत धक्काबुक्की केली. उपस्थित पोलिसांनी हस्तक्षेप करीत ढवळे यांच्यासह आंदोलकांना कक्षाबाहेर काढले.

खरीप हंगामात जिल्ह्यातील ४ लाख ६७ हजार २१ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा काढला. त्यासाठी शेतकऱ्यांनी आणि केंद्र व राज्य सरकारने ईफको टोकीयो या विमा कंपनीकडे १६७ कोटी रूपयांचा विमा हप्त्याचा भरणा केला. खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस ही दोन्ही पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली. मात्र विमा कंपनीने जिल्ह्यातील अत्यल्प शेतकऱ्यांना मोबदला दिला. त्यामुळे विमा कंपनीने पीक नुकसानीचे सर्वेक्षण  करून शेतकऱ्यांना परतावा देण्याची मागणी खासदार भावना गवळी यांनी शासनस्तरावर आणि पिक विमा कंपनीकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

अखेर खासदार भावना गवळी यांनी आज दुपारी येथील स्टेट बँक चौक स्थित ईफको टोकीयो कंपनीच्या कार्यालयापुढे ‘जवाब दो’ आंदोलन केले. यावेळी भाषणानंतर खासदार गवळी शिष्टमंडळासह विमा कंपनीच्या व्यवस्थापकांशी चर्चा करण्यासाठी त्यांच्या कक्षात गेले. यावेळी भावना गवळी यांनी व्यवस्थापकांच्या टेबलवर फाईल फेकून त्यांना जाब विचारला. ही चर्चा सुरू असताना संतोष ढवळे यांनी सोयाबीन, कापूस कसा असतो बघितला का? असे प्रश्न विचारत व्यवस्थापक सचिन सुरोशे यांच्या अंगावर सोयाबीन टाकून त्यांची कॉलर ओढर धक्काबुक्की केली व मारहाणीचा प्रयत्न केला. उपस्थित पोलिसांनी तातडीने ढवळे यांच्यासह आंदोलकांना कक्षाबाहेर काढले. बाहेर पुन्हा सभा झाली, यावेळी इफको टोकीयो कंपनीस हद्दपार करण्याचे आवाहन  भावना गवळी यांनी शेतकऱ्यांना केले.