स्थानिक मजूरवर्ग आर्थिक कात्रीत; प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा

कासा : जव्हार भागामध्ये पावसाळ्यात बहरणारा पर्यटन उद्योग यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर अडचणीत आला आहे. परिणामी या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या शेकडो कुटुंबांवर आर्थिक अरिष्ट कोसळले आहे. खरिपातील पीक हाती पडल्यानंतरच या भागातील आर्थिक गाडय़ाला चालना मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, एका बाजूला बंद पडत असलेला रोजगार आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक चणचण अशा दुहेरी कात्रीत येथील मजूरवर्ग सापडला असून यावर प्रशासनाकडून योग्य पावले उचलण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

जव्हार हे पालघर जिल्ह्यातील महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. समुद्रसपाटीपासून दीड-पावणेदोन हजार फूट उंचीवर असल्याने इथली हवा थंड व आल्हाददायक आहे. तिन्ही ऋतूंत जव्हारला पर्यटकांची

ये-जा असते. मात्र पावसाळ्यात पर्यटकांची संख्या अधिक असते. परंतु करोनाची पार्श्वभूमी आणि वाढती रुग्णसंख्या यांचा परिणाम येथील पर्यटन व्यवसायावर झाला आहे.

येथील उपाहारगृह व वाहन व्यवसाय, स्थानिक आदिवासी मजूर, विविध कलाकुसरीच्या वस्तू विकणारे विक्रेते यांना मोठय़ा आर्थिक तोटय़ाला सामोरे जावे लागत असून त्यापैकी अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

जव्हारचा जयसागर धबधबा, देवबागचा धबधबा, सूर्योदय व सूर्यास्ताचे मनोरम दृश्य, जव्हारचा भुईकोट, इतिहासप्रसिद्ध जुना आणि नवा राजवाडा, शिरपामाळ आणि आदिवासी संस्कृती त्यांची तारपानृत्ये, तेथील विविध वाद्ये, आदिवासींची देवदेवता, वारली चित्रकला, कलात्मक खेळणी, इत्यादी पाहण्यासाठी पर्यटकांची पावले इकडे आपसूक वळतात. या हजारोंच्या संख्येने येथे पर्यटक येत असतात. पर्यटकांसाठी येथे उपाहारगृह, रिसॉर्टमध्ये राहण्याची जेवणाची उत्तम सोय आहे.

येथे येणाऱ्या पर्यटकांमुळे उपाहारगृह व वाहन व्यवसाय, परिसरातील प्रचलित खाद्यपदार्थ या माध्यमातून येथील नागरिकांना चांगला रोजगार मिळत असतो. शिवाय अनेक आदिवासी स्थानिकांना विविध वाद्ये, वारली चित्रकला, कलात्मक खेळणी, स्थानिक खाद्यपदार्थ जसे काकडी वाळूक यांच्या विक्रीतून रोजगार उपलब्ध होत असतो.

रिसॉर्ट, उपाहारगृह या ठिकाणीही रोजगार मिळत असतो. मात्र या वर्षी करोनाचे संकट ओढवल्याने वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता वेळोवेळी टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे पर्यटक जव्हारकडे पाठ फिरवू लागल्याने पर्यटनाच्या माध्यमातून मिळणारा रोजगार बंद पडला.