-रवींद्र जुनारकर

गडचिरोली : नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील एटापल्ली तालुक्यातील जवेली खुर्द ग्राम पंचायतीत ५७ वर्षानंतर प्रथमच निवडणूक झाली. कुठलाही बहिष्कार, हिंसाचाराशिवाय झालेली अतिदुर्गम भागातील ही निवडणूक ऐतिहासिक ठरली आहे. नक्षलवाद्यांच्या प्रभावक्षेत्रात निवडणूक यशस्वीरित्या घेतल्याबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस दल तथा जिल्हा प्रशासनाचे कौतूक केले आहे.

एटापल्ली तालुका हा या आदिवासी जिल्ह्यातील एका दुर्गम कोपरा आहे. तिथे पहिल्यांदाच मतदान झाले. महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील जवेली खुर्द ग्रामपंचायतीमध्ये सात गावांचा समावेश आहे. ५७ वर्षात येथे पहिल्यांदाच मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. विशेष म्हणजे पंचायत समिती अस्तित्वात आल्यापासून येथे या गावात प्रथमच निवडणूक झाली.

जवेली येथे निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी पोलीस दल, सी ६० तथा सीमा सुरक्षा दलाच्या कडक बंदोबस्तात नऊ मतदान पथकांची टीम कन्हाळगाव बेसकॅम्प येथे हेलिकॅप्टरने दाखल झाली. तिथून राज्य सीमेवरील जंगलातून सुमारे १३ कि.मी. पायी प्रवास करीत जवेली गावात पोहचली. हा परिसर माओवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. २० जानेवारी रोजी नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात ग्रामपंचायत निवडणूकीसाठी झालेले मतदान अधिक महत्त्वाचे ठरले. खेड्यांमधील मतदान केंद्रावर सुमारे ५८% मतदान झाले. नऊ पैकी सात प्रभागांसाठी येथे प्रतिनिधी निवडलेले गेले.

यापूर्वी सर्व ग्रामपंचायती निवडणुकांमध्ये नक्षलवाद्यांनी उभे केलेले उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे मतदानाच्या दिवशी नक्षलवादी मतदान केंद्र असलेल्या गावाच्या सभोवताल होते. मात्र सुरक्षा दल असल्यामुळे घातपात केला नाही. मतदान शांततेत व्हावे यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, डीआयजी संदीप पाटील यांच्या यांच्या नेतृत्वात सुरक्षा दल तैनात केले होते.

तहसीलदार अजय नष्टे म्हणाले की, “१९६४ला ग्रामपंचायतींची राज्यात स्थापना झाली. तेव्हापासून या गावात निवडणूक झाली नव्हती. गावातील तरूणांनी निवडणुकीसाठी पुढाकार घेतला. कोतवाल रामा पुंगाटी आणि तलाठी सुरेश उसेंडी यांनी आदिवासींना निर्भयपणे मतदान करण्याचे व आपले प्रतिनिधी निवडण्याचे प्रोत्साहन दिले. आम्ही लोकांमध्ये जावून जनजागृती केली. त्याचा परिणाम येथे निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे राबविता आली. नऊ पैकी सात प्रभागात निवडणूक झाली. दोन प्रभागांसाठी उमेदवारी अर्जच आले नाही. त्या दोन जागा रिक्तच राहिल्या आहेत,” असं नष्टे यांनी सांगितले. जिल्हा पोलिस प्रशासनाच्या मदतीमुळेच ही निवडणूक शक्य झाल्याचेही ते म्हणाले.