हवेतील बाष्पापासून पिण्याचे पाणी तयार करणारे यंत्र जायकवाडी जलाशयाच्या भिंतीवर चाचणीसाठी मॅसकुल टेक्नॉलॉजी या कंपनीने बसविले आहे. या यंत्रातून शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळत असून पर्यटकांचे ते एक आकर्षण बनले आहे.पाण्याचे बाष्पीभवन होते त्या वेळी हवेत आर्द्रता असते. या बाष्पाचा वापर करून यंत्राच्या साहाय्याने पिण्याचे पाणी तयार करण्याचे प्रयोग २००५ सालापासून अनेक देशांत सुरू झाले. फ्लोरिडा येथील एअर वॉटर कॉपरेरेशनच्या तांत्रिक सहकार्याने भारतातील मॅसकुल टेक्नॉलॉजी या कंपनीने हे वॉटरमेकर मशीन तयार केले आहे. सुरुवातीला हे यंत्र पैठण शहरात बसविण्यात आले होते. तेथील हवेत ३५ टक्केआर्द्रता होती. त्यामुळे कमी पाणी मिळत असे. औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने हे यंत्र चाचणीसाठी जायकवाडी धरणाच्या भिंतीवर मुख्य मोऱ्यांवर बसविण्यात आले. या भागात हवेतील बाष्पाचे प्रमाण हे जास्त असते. त्यामुळे तेथे २४ तासांत ७०० लीटरपेक्षा जास्त पाणी मिळते. हवेत ४० टक्के आद्र्रता असेल तर ५६८ लीटर, ५० टक्के आर्द्रता असेल तर ७२० लीटर व ६० टक्के आद्र्रता असेल तर ७२० लीटर पाणी २४ तासांत मिळते. या यंत्रामुळे जायकवाडी धरणावरील कर्मचारी व पर्यटकांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी मिळत आहे. यंत्राची चाचणी झाल्यानंतर ते परत नेले जाणार आहे.
पैठण हे धार्मिक क्षेत्र असून, एकनाथमहाराजांची समाधी तेथे आहे. धार्मिक व पुरातत्वीय तसेच ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या शहरात भक्त तसेच जायकवाडी जलाशय व उद्यानामुळे पर्यटकही मोठय़ा संख्येने येतात. हवेतील बाष्पापासून यंत्राद्वारे बनविलेल्या पाण्याची गोडी अनेक जण चाखत असतात.