येत्या तीन दिवसांत साडेपाच टीएमसी जलपुरवठा अपेक्षित

सर्वोच्च न्यायालयाने पद्मश्री विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखान्याची याचिका फेटाळल्यानंतर जायकवाडीत पाणी सोडण्याच्या हालचालींना बुधवारी रात्रीपासून सुरुवात झाली. गुरुवारी विविध धरणसमूहातून दुपारी १२च्या दरम्यान २२ हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. त्याचा वेग काहीसा वाढला तरी जायकवाडी जलाशयात पाणी पोहोचण्यास ५५ ते ५८ तासांचा वेळ लागेल, असा जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

जायकवाडी जलाशयात निर्माण झालेली तूट समान पद्धतीने वाटून घेण्याबाबतचे आदेश जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिले होते. या आदेशान्वये ८.९९ टीएमसी पाणी सोडले तर तूट भरून निघेल, असे आदेश गोदावरी पाटबंधारे मंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांनी दिले होते. त्याला न्यायालयीन कचाटय़ात अडकवून केला जाणारा विरोध नाहक असल्याने मराठवाडय़ातून रोष व्यक्त होत होता. गुरुवारी सकाळी दहाच्या दरम्यान पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळाला आहे.

न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर मुळा धरणसमूहातून १.९० अब्ज घनफूट, प्रवरा धरणसमूहातून ३.८५, गंगापूर धरणातून ०.६०, दारणा समूहातून २.४ व पालखेड समूहातून ०.६० असे ८.९९ टीएमसी पाणी सोडण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली. तत्पूर्वी बंधाऱ्यांमधील लाकडी फळ्या काढण्यात आल्या.

पाण्याचा प्रवास..

जायकवाडी ते दारणा हे अंतर २१५ किलोमीटरचे आहे. तर गंगापूर धरणापासून २१५ कि.मी., निळवंडेतून १९० कि.मी., तर मुळा धरणातून ५२ कि.मी.चा प्रवास पाण्याला करावा लागणार आहे. वाळूमुळे निर्माण झालेले खड्डे आणि पात्र कोरडे असल्यामुळे साधारणत: साडेपाच टीएमसी पाणी जायकवाडी जलाशयात येईल, असा जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.