|| हर्षद कशाळकर

आमदारकीची हॅट्ट्रिक; सर्वपक्षीय स्नेहामुळे राजकीय वाटचाल सुकर

राज्याच्या राजकारणात एकेकाळी प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका बजाविणारा शेतकरी कामगार पक्ष आता रायगड आणि अन्य काही जिल्ह्यांपुरताच मर्यादित राहिला असला तरी पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी आपले राजकीय महत्त्व मात्र कायम राखले आहे. दोन-चार आमदारांच्या जोरावर विधान परिषदेच्या आमदारकीची हॅट्ट्रिक गाठण्याची किमया त्यांनी साधली आहे.

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यात तीन आमदार असलेल्या शेकापचे जयंत पाटील हे सुद्धा निवडून आले. ११व्या जागेवर तिसऱ्यांदा निवडून येण्याचा विक्रम पाटील यांनी केला आहे. एकेकाळी रायगडच्या राजकारणात शेकापशिवाय पान हलत नसे. आता जिल्ह्यातही शेकापची ताकद कमी झाली आहे. पण जयंत पाटील यांचे राज्य पातळीवरील महत्त्व अबाधित आहे. अपक्ष आमदार आणि अन्य राजकीय मित्रांच्या मदतीने जयंत पाटील यांनी लागोपाठ तिसऱ्यांदा निवडून येण्याची किमया साधली आहे.

जयंत पाटील यांना सर्वच राजकीय पक्षांची मदत झाली. अपक्ष आणि शिवसेनेकडील अतिरिक्त मतांवर जयंत पाटील यांचा डोळा होता. प्रत्यक्ष मतदान झाले असते तर आवश्यक मतांची बेगमी पाटील यांनी केली होती. यामुळेच शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी जयंत पाटील यांना अतिरिक्त मते देऊ नयेत, अशी भूमिका मांडली होती.

जयंत पाटील यांना निवडून आणणे ही राष्ट्रवादी काँग्रेसची नैतिक जबाबदारी होती, कारण सुनील तटकरे यांना सारी मदत पाटील यांनी केली आहे. तटकरे यांच्या कन्येला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद तसेच तटकरे पुत्राला विधान परिषदेवर निवडून आणण्यात शेकाप किंवा जयंत पाटील यांची भूमिका महत्त्वाची होती. पाटील यांना निवडून येणे शक्य झाले नसते तर आगामी काळात रायगड जिल्ह्यात त्यांना याची मोठी किंमत चुकवावी लागू शकली असती. जिल्हा परिषदेतील शेकाप आणि राष्ट्रवादी यांची आघाडी अडचणीत आली असती. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सुनील तटकरे हे रायगड मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. अशा वेळी शेकापची साथ मिळाली नाही तर तटकरेंच्या अडचणी वाढल्या असत्या. पाटील यांच्या बिनविरोध निवडीमुळे हा प्रश्न निकाली निघाला आहे.

योग्य वेळी, योग्य राजकीय भूमिका घेऊन आपला कार्यभाग साधायचा आणि राज्याच्या राजकारणात स्वत:चे अस्तित्व कायम राखायचे हे धोरण जयंत पाटील यांनी अवलंबिले आहे. सत्ता कुठल्याही पक्षाची असली तरी सत्ताधाऱ्यांशी त्यांनी जुळवून घेतले आहे. अलीकडेच त्यांच्या एका कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहिले होते. कधी रिपब्लिकन पक्षांची आघाडी करून तर डाव्या विचारांच्या पक्षांची मोट बांधून त्यांनी राज्याच्या राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण दोन्ही वेळा ते अपयशी ठरले. पण त्यांनी जिद्द सोडली नाही. पक्षाचे अस्तित्व कायम राहावे यासाठी आता त्यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळवून घेतले आहे. पारंपरिक विरोधक असणाऱ्या काँग्रेसलाही चुचकारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

राजकारणाबरोबरच जयंत पाटील यांचा सहकार क्षेत्र, उद्योग आणि साखर कारखानदारीत सक्रीय सहभाग आहे. या तिन्ही क्षेत्रांचा आपल्या राजकीय वाटचालीसाठी त्यांनी वापर करून घेतला आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांमध्ये त्यांचे वैयक्तिक संबंध प्रस्थापित झाले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकीय पटलावर शेकापचे अस्तित्व नगण्य असले तरी पाटील यांचे अस्तित्व अबाधित आहे.