गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या कंगना रणौतच्या मुंबईतील कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेनं हातोडा चालवला. महापालिकेच्या या कारवाईनंतर कंगना रणौत विरुद्ध शिवसेना या संघर्षाच्या चर्चा सुरू झाल्या. याचं कारवाईवरून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. मात्र, टीका करताना फडणवीस यांनी हिंदीतून भाष्य केलं. त्यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सवाल उपस्थित केला आहे.

अभिनेत्री कंगना रणौतच्या मुंबईतील कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामावर बृह्नमुंबई महापालिकेनं बुधवारी कारवाई केली. अनधिकृत असलेलं बांधकाम महापालिकेनं पाडलं. कंगनाच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाईवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. फडणवीस यांनी टीका करताना हिंदी भाषेचा वापर केला. त्यावरून जयंत पाटील यांनी त्यांना चिमटीत पकडत प्रश्न उपस्थित केला आहे.

“विषय महाराष्ट्राचा प्रतिक्रिया हिंदीत? महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते बोलत आहेत की भाजपचे बिहार निवडणूक प्रभारी हे महाराष्ट्रातील जनतेला कळायला हवं?,” असं जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारलं आहे.

देवेंद्र फडणवीस व्हिडिओत काय म्हणाले आहेत?

अमृता यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई सर्वांवर झाली तर ती योग्य वाटली असतील असं म्हटलं आहे. “आपल्या विरोधात बोलणाऱ्यांना आम्ही रस्त्यामध्ये थांबवून मारु. हे काम सरकारच्या समर्थनाने करु हे असं याआधी महाराष्ट्राच्या इतिहासात घडलं नाही. जे चूक आहे त्याला चूक म्हटलं पाहिजे. मात्र त्या गोष्टींने महाराष्ट्राचा किंवा महाराष्ट्र पोलिसांचा अपमान झाला आहे. महाराष्ट्राचा तेवढाच अपमान देशभरामध्ये सरकार ज्या पद्धतीने कारवाई करत आहे त्यामुळे होत आहे. बेकायदेशीर बांधकाम असेल तर बांधकामावर कारवाई केलीच पाहिजे. मात्र सर्वांविरोधात ही कारवाई झाली असती तर योग्य कारवाई असती. कोणीतरी आपल्याविरोधात बोललं म्हणून आपण कारवाई करत असू तर हा भित्रेपणा आहे, सूड उगवण्याच्या भावनेने केलेली कारवाई आहे असं दिसतं. महाराष्ट्रामध्ये अशा भावनेचा सन्मान होणं शक्य नाही,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.