परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी देशमुख यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार, या प्रश्नावर सध्या चर्चा सुरू आहे. देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही नावांची चर्चा केली जात आहे. यात उत्पादन शुल्क आणि कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांचं नाव आघाडीवर असल्याचं वृत्त आहे.

मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी केल्यानंतर पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. १०० कोटींची वसूली करण्याचं कामही देशमुख यांनी पोलिसांना दिलं होतं, असंही सिंह यांनी आरोपात म्हटलं होतं. तेव्हापासून देशमुख वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यानंतर आज या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर देशमुख यांनी राजीनामा दिला.

मंत्रिमंडळातील खातेवाटपात गृहखात राष्ट्रीवादीला देण्यात आलेलं आहे. त्यामुळे देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादीतून कुणाची वर्णी लागणार अशी चर्चा सुरू असतानाच काही नावं समोर येत आहेत. यात राज्याचे उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.

अनिल देशमुख यांनी दिला गृहमंत्रीपदाचा राजीनामा

यात दिलीप वळसे-पाटील यांचं नाव आघाडीवर असल्याचं समजते. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपद देण्याची इच्छा होती. मात्र, दिलीप वळसे-पाटील यांनी प्रकृतीचं कारण देत गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे अनिल देशमुख यांच्याकडे हे पद देण्यात आलं होतं. मात्र, आता पुन्हा एकदा वळसे-पाटील यांच्याकडेच गृहमंत्रीपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्याकडील उत्पादन शुल्क व कामगार मंत्रालयाचा भार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिला जाणार असल्याचं बोललं जात आहे.

गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

दुसरीकडे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे कोल्हापूरमधील नेते हसन मुश्रीफ आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचाही गृहमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीकडून विचार केला जाऊ शकतो. सरकार स्थापनेवेळी शरद पवार यांची वळसे-पाटील यांच्याबरोबर जयंत पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपद देण्याला संमती होती. मात्र, दोघांनी नकार दिल्यामुळे अनिल देशमुखांना हे खात सोपवण्यात आलं होतं.

“देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले”

देशमुख वादात अडकल्यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्रीपदाबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. “देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. या पदाची एक प्रतिष्ठा व रुबाब आहे,दहशतही आहे. आर. आर. पाटील यांच्या गृहमंत्री म्हणून कार्यपद्धतीची तुलना आजही केली जाते. संशयास्पद व्यक्तीच्या कोंडाळ्यात राहून गृहमंत्री पदावरील कोणत्याही व्यक्तीस काम करता येत नाही. पोलीस खाते आधीच बदनाम. त्यात अशा गोष्टींमुळे संशय वाढतो. देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावे. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशांचे जाहीर आदेश देणे बरे नाही. पोलीस खात्याचे नेतृत्व फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसते. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते,” असं राऊत म्हणाले होते.