|| एजाज हुसेन मुजावर
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे जयंत पाटील यांच्या हाती गेल्यानंतर पक्षाची पुनर्रचना करताना अकलूजचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांची सरचिटणीसपदी नियुक्ती हा राज्याच्या पातळीवर त्यांचा सन्मान समजला जातो. या नियुक्तीमुळे इकडे सोलापूर जिल्ह्य़ातील पक्षांतर्गत राजकारणात मोहिते-पाटील गटाला सावरण्याची आणि पुन्हा पकड बसविण्याची संधी मिळेल काय, हा औत्सुक्याचा विषय स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेला जात आहे. गेली नऊ-दहा वर्षे पक्षांतर्गत राजकारणात मोहिते-पाटील गटाची कोंडी होत असताना त्यांच्या विरोधकांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून छुप्या पद्धतीने मिळत असलेली ताकद यापुढेही अशीच कायम राहणार की त्यावर कोठे तरी पायबंद बसणार, याचे उत्तर नजीकच्या काळातच स्पष्ट होणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील राजकारण, सहकार, अर्थकारणात अनेक वर्षे दबदबा ठेवणारे अकलूजच्या मोहिते-पाटलांचे तालेवार घराणे २००९ च्या विधानसभा निवडणुकीपासून हळूहळू मागे पडत गेले आहे. पक्षांतर्गत वाटमारीच्या राजकारणात या गटाचे जमेल तसे पंख छाटण्याचे प्रकार घडताना पाहावयास मिळाले आहे. जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ, काही साखर कारखाने अशी हुकमी सत्तास्थाने वर्षांनुवर्षे ताब्यात ठेवणाऱ्या मोहिते-पाटील यांच्याशिवाय जिल्ह्य़ातील राजकारणात साधी काडीही हालत नसे. यात पीछेहाट होताना मोहिते-पाटील विरोधक मात्र प्रबळ होत गेले आहेत. यापैकी काही विरोधकांचा राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर लौकिकार्थाने काहीही संबंध उरला नसला तरी त्यांच्या माथ्यावर ‘अजितनिष्ठ’ म्हणून मारला गेलेला शिक्का अजूनही कायम असून तो पुसला जात नाही. जिल्ह्य़ातील सत्तास्थाने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पक्षाच्या ताब्यात असूनही निर्णय प्रक्रियेत मोहिते-पाटील गटाला स्थान मिळू शकत नाही, तर त्यांच्या विरोधकांचीच चलती असल्याचे पाहावयास मिळते.
या पाश्र्वभूमीवर गेल्या २०१४ च्या माढा लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील हे तावूनसुलाखून निघाले व खासदार झाले. खासदारकीच्या माध्यमातून त्यांचे अस्तित्व स्वीकारणे भाग पडले खरे; परंतु दुसरीकडे जिल्ह्य़ात पक्षाची होत गेलेली पडझड रोखण्याची इच्छाशक्ती पक्षाच्या नेतृत्वाकडे नसल्यामुळे सध्या पक्षाचा हा ‘बालेकिल्ला’ पुरता पोकळ ठरला आहे.
स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचा झालेला धक्कादायक पराभव झाल्यानंतरसुद्धा त्याविषयाचे गांभीर्य कोणालाच वाटले नाही. त्यानंतर दीड वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत सत्ता कायम राखणे सहज शक्य असतानादेखील भाजप पुरस्कृत महाआघाडीच्या माध्यमातून ‘अजितनिष्ठां’नाच आंदण दिली गेलेली सत्ता हा सारा पक्षातील बेदिली वाढविणारा ठरला आहे.
आश्चर्य म्हणजे पक्षाला हानीकारक ठरलेल्या या साऱ्या घडामोडी घडत गेल्या तेव्हा दस्तुरखुद्द अजित पवार यांच्यावर पक्षाच्या जिल्हा प्रभारी पदाची जबाबदारी होती. एकीकडे जिल्हा परिदेची सत्ता गमावली असताना इकडे सोलापूर महापालिकेत पक्षाच्या नगरसेवकांची संख्या १६ वरून एकदम ४ पर्यंत खाली आली. अशा प्रकारे पक्षाची पीछेहाट होत असताना मोहिते-पाटील गटाने काहीसे सावध राहून अजित पवारांपासून दूर राहणेच पसंत केल्याचे पाहावयास मिळाले आहे.
पक्षबांधणी महत्त्वाची
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेसची बांधणी योग्य प्रकारे करण्याची गरज आहे. पक्ष सावरला तरच सोलापूरचा बालेकिल्ला अबाधित राहू शकेल. त्याचा विचार करताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या कार्यकारिणीत रणजितसिंह मोहिते-पाटील यांना सरचिटणीसपदावर स्थान देणे ही पक्ष सावरण्याची सुरुवात असल्याचे मानले जात आहे. मोहिते-पाटील यांच्याशिवाय मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांनाही सरचिटणीसपदी संधी देण्यात आली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांच्या कार्यपद्धतीत योग्य बदल होणे अपेक्षित आहे. दीपक साळुंखे हे पूर्वी विधान परिषद सदस्य होते. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून दुसऱ्यांदा संधी देण्यात आली असता त्यांचा पराभव झाला. ज्यांनी पराभव केला, त्यांच्याशी असलेली नाळ साळुखे यांना तोडावी लागणार आहे. ‘वरून कुस्ती-आतून दोस्ती’ अशा प्रकारांची पुनरावृत्ती होणार असेल तर पक्ष एकसंध राहणार कसा, याचे उत्तर शेवटी पक्षश्रेष्ठींना द्यावे लागणार आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनाही त्या अनुषंगाने सजग राहावे लागणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 30, 2018 1:15 am